” युवा भरारी ” युवकांच्या मनात नवचैतन्य निर्माण करणारा कौतुकास्पद उपक्रम – नरेंद्र बरडिया
राजु तुरणकर – संपादक.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा “युवा भरारी” हा उपक्रम खरोखरच अत्यंत सुंदर असून त्याचे शीर्षकच अत्यंत चिंतन करण्याजोगे आहे युवकांच्या मनामध्ये भरारीचे ध्येय आणि उमेद जागृत करणारा हा उपक्रम निश्चितच त्यांच्या जीवनाला प्रेरणादायी आणि परिवर्तनीय ठरेल. हे महाविद्यालय आणि या महाविद्यालयातील साधनसामुग्री ही आपली आहे या भूमिकेतून याचे जतन करीत भावी पिढ्यांच्या समोर आपण आदर्श निर्माण करायला हवा. व्यवस्थापनाच्या सकारात्मक भूमिकेला आपले सहकार्य अपेक्षित असून दृष्टिकोन बदलविल्यास नवीन व्यवस्था निर्माण करता येते त्यासाठी अनुशासन हाच आपल्या आनंदाचा आधार आहे हे मनात ठसवायला हवे.” असे विचार शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाद्वारे आयोजित युवा भरारी या त्रिदिवसीय विशेष कला महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते व्यक्त होत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव अशोक सोनटक्के संचालक उमापती कुचनकार, अनिल जयस्वाल तथा प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे उपस्थित होते. दीप प्रज्वलन, नटराज पूजन आणि लोकमान्य टिळकांच्या प्रतिमापूजनानंतर विद्यापीठ गीत गायनाने कार्यक्रमाचा आरंभ झाला.
प्रास्ताविकामध्ये विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. अभिजित अणे यांनी विविध तेरा कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागाचा आनंद व्यक्त करीत रील मेकिंग स्पर्धा ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यामागील भूमिका स्पष्ट केली.
प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी विद्यापीठाच्या सातत्यपूर्ण वेळापत्रकात थोडा सकारात्मक विरंगुळा मिळावा म्हणून या उपक्रमाचे वैशिष्ट्य अधोरेखित करीत यातून पुढील अध्ययनासाठी आवश्यक ऊर्जा संपादन करावी असे आवाहन केले.
आयुष्यात हे क्षण पुन्हा येत नाहीत असे म्हणत कार्यक्रमाचे उद्घाटक अशोक सोनटक्के यांनी अधिकाधिक संकेत सहभाग घेत विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्वाचा विकास करीत मनमुराद आनंद लुटावा असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. नीलिमा दवणे यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ गुलशन कुथे यांनी केले. उद्घाटन प्रसंगी चेतना गेडाम हिच्या व्यक्तिगत तथा मागील वर्षी विद्यापीठाच्या युवा महोत्सवात महाविद्यालयातर्फे सादर झालेल्या समूह नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.