नायगाव शिवारात मध्यरात्रीची धक्कादायक घटना; रेल्वे पटरीवर तरुणाचा मृतदेह आढळला.
आत्महत्या की अपघात ? पोलिस तपास सुरू.
नायगाव शिवारातील रेल्वे मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास एका तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सुरुवातीला मृत तरुणाची ओळख पटली नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव शिवारातून रेल्वे मार्गावरून गाडी जात असताना संबंधित तरुणाला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या शरीराचे दोन भागात विभाजन झाल्याचे कळते, ही घटना अपघाताने घडली की संबंधित तरुणाने आत्महत्या केली, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस व वणी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
दरम्यान, मृत तरुणाची ओळख अद्वैद विजय माळीकर (रा. नांदेपेरा रोड, लॉयन्स स्कूलच्या मागे) अशी झाल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेमागील नेमके कारण काय, याचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
काल मोठया भावाचा अपघात झाल्याने त्याच्यावर नागपुरात येथे उपचार सुरू आहेत, दरम्यान वडील, काका नागपूर येथे असताना लहान मुलगा मरण पावल्याची बातमी माळीकर परिवार यांना कळल्याने त्यांनी नागपूर वरून निघाले आहेत.











