व्यवहार गोठवा !’ श्री गणेश गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांचा एल्गार.
विशेष लेखापरीक्षण, प्लॉट विक्रीवर बंदी, चौकशी करा अन्यथा आंदोलन.

वणी : येथील श्री गणेश गृहनिर्माण सहकारी सोसायटी (रजि. क्र. 1141) मधील आर्थिक व प्रशासकीय कामकाजात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत काही रहिवासी नागरिकांनी जिल्हा निबंधक, सहकारी संस्था विभाग यवतमाळ यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.
राजु तुरानकर यांनी मागितलेल्या माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रे, ऑडिट अहवाल आणि उपलब्ध अभिलेखांचा अभ्यास केल्यानंतर अनेक तफावती निदर्शनास आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. संस्थेच्या मंजूर नकाशानुसार सोसायटीत एकूण 53 प्लॉट असताना विविध वर्षांच्या ऑडिट अहवालांमध्ये 48 व 51 प्लॉट अशी वेगवेगळी संख्या नमूद करण्यात आल्याने संशय निर्माण झाला आहे.

काही वर्षांचे ऑडिट अहवाल उपलब्ध नसल्याने तसेच लेखापरीक्षण प्रत्यक्ष पडताळणी करून झाले की केवळ कागदोपत्री, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. दरम्यान, संस्थेचे दप्तर जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत असल्याने प्रकरण अधिक गंभीर बनल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत संस्थेच्या मालमत्ता, प्लॉट हस्तांतरण, आर्थिक व्यवहार व बँक खात्यांवरील व्यवहारांवर तात्पुरते निर्बंध घालावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या सर्व व्यवहारांची विशेष लेखापरीक्षा (स्पेशल ऑडिट), प्लॉट संख्येतील तफावतीची चौकशी, संबंधित लेखापरीक्षकांच्या भूमिकेची स्वतंत्र तपासणी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी श्री गणेश गृहनिर्माण सोसायटी मधील रहिवाशी सुभाष पाचभाई, बंडू मोतीराम बोथले, नारायण चटप, लीलाधर धोबे,मधुकर कोंगरे, बन्सी ढेंगळे, श्रीमती नम्रता विनोद गाथाडे, भास्कर बोधाडकर, प्रमोद गेडाम वसंत काकडे, सुरेश ठाकरे, विवेक ठाकरे, अरविंद डाखरे, दीपक जोगी इत्यादी उपस्थित होते.

सहकार क्षेत्रातील पारदर्शकता व सभासदांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.













