वणीकरांच्या अपेक्षांचे ओझे नव्या ठाणेदारांच्या खांद्यावर.
नवनियुक्त ठाणेदार पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या समोर अवैध धंदे आवरन्याचे आवाहन.

राजु तुरानकर – संपादक – लोकवाणी जागर..
विषेश विश्लेषण | वणी नवनियुक्त ठाणेदार पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या समोर अवैध धंद्यांवर आळा घालण्याचे मोठे आव्हान उभे आहे. वणी शहर व परिसरात अवैध मटका, अमली पदार्थांची तस्करी, नियमबाह्य दारू विक्री तसेच इतर बेकायदेशीर प्रकारांबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असतात. त्यामुळे नव्या ठाणेदारांच्या कार्यकाळाकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
यासोबतच पोलीस ठाण्यातील अंतर्गत प्रशासन अधिक पारदर्शक व उत्तरदायी करण्याचेही आव्हान आहे. सामान्य नागरिकांच्या तक्रारी वेळेत नोंदवून घेणे, गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेत होणारा विलंब टाळणे आणि प्रत्येक अर्जावर योग्य कार्यवाही होणे ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहरात अनेक वर्षांपासून एकाच भागात कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांबाबतही चर्चा रंगत असतात. दीर्घकाळ एका परिसरात राहिल्यामुळे स्थानिक हितसंबंध, ओळखी आणि प्रभाव यांचा कारवाईवर परिणाम होतो का, असा प्रश्न काही नागरिक उपस्थित करतात. मात्र अशा बाबींची वस्तुनिष्ठ तपासणी व प्रशासकीय पुनरावलोकन करणे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अधिकारक्षेत्र आहे.
वणीकरांच्या प्रमुख अपेक्षा..अवैध मटका व जुगार व्यवसायांवर कठोर कारवाई.अमली पदार्थ तस्करीविरोधात विशेष मोहीम. नियमबाह्य दारू विक्रीवर नियंत्रण. नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद.पोलीस प्रशासनात पारदर्शकता व उत्तरदायित्व. कर्मचारी व अधिकाऱ्यांवर प्रभावी अंतर्गत नियंत्रण यंत्रणा.कायदा व सुव्यवस्थेचा धाक निर्माण करणे. प्रशासनावर वचक आणि अंकुश कसा येईल?
प्रभावी देखरेख, नियमित आढावा बैठका, तक्रार निवारण यंत्रणा, अचानक तपासण्या, संवेदनशील ठिकाणांवरील विशेष पथके आणि नागरिकांशी थेट संवाद यामुळे प्रशासनावरील विश्वास वाढू शकतो. तसेच कोणत्याही व्यक्ती, गट किंवा हितसंबंधापेक्षा कायद्याला प्राधान्य देणे हीच खरी कसोटी ठरणार आहे.
माणसे बदलतात, पदाधिकारी बदलतात; परंतु वणीकरांना आता व्यवस्थेतील सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. नव्या ठाणेदारांच्या नेतृत्वात ही अपेक्षा कितपत पूर्ण होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.













