“एकच उमेदवार असला तरी जनतेचा कौल घ्या; लोकशाहीत बिनविरोध संस्कृतीला आळा घाला”
नगरसेवक अजय धोबे यांची विधानपरिषद निवडणूक प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी.
दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध, यवतमाळ जिल्ह्यातील नाट्यमय घडामोडी..
नगरसेवकांची तळमळ; विरोधी पुढारी चिरनिद्रेत?

वणी, दि. ४ जून : यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणूक 2026 मध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ईतर सर्व उमेदवारांनी अर्ज वापस घेतल्याने महायुतीचे दुष्यंत चतुर्वेदी हे बिनविरोध झाल्याचे निश्चित झाले आहे.या संपूर्ण प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, व लोकशाहीत मतदानाचा अधिकार अबाधित ठेवा अशी मागणी वणी नगर परिषदेचे नगरसेवक अजय पांडुरंग धोबे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, यवतमाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

धोबे यांनी दिलेल्या निवेदनात उमेदवारी अर्ज मागे घेण्यामागे राजकीय दबाव, आर्थिक प्रलोभन, धमकी किंवा अन्य कोणताही अनुचित हस्तक्षेप झाला असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा अधिकार असून, कोणत्याही दबावाखाली उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले गेले असल्यास तो प्रकार लोकशाही मूल्यांवर घाला घालणारा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष व पारदर्शक राहण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, तसेच निवडणूक प्रक्रियेत आर्थिक व्यवहार, प्रलोभन किंवा बेकायदेशीर हस्तक्षेप झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा आत्मा असल्याचे सांगत मतदारांचा विश्वास कायम राखण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
या प्रसंगी वणी नगर परिषदेचे नगरसेवक अजय धोबे, मारेगाव नगर पंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की, आशिष रिंगोले आणि रवींद्र कांबळे उपस्थित होते.
दरम्यान, एका नगरसेवकाने पुढाकार घेत निवडणूक प्रक्रियेतील संशयास्पद घडामोडींवर प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली असताना, विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेते आणि पुढारी मात्र अद्याप मौन बाळगून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे “नगरसेवकांची तळमळ; विरोधी पुढारी चिरनिद्रेत?” असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.
निवेदनातील सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा म्हणजे:
“एकच उमेदवार शिल्लक राहिला तरी मतदान घेण्यात यावे” नगरसेवक अजय धोबे यांनी निवेदनात अशी मागणी केली आहे की, निवडणूक बिनविरोध होण्याऐवजी अंतिम टप्प्यात केवळ एकच उमेदवार उरला तरी मतदारांना मतदानाचा अधिकार मिळावा. त्यासाठी मतपत्रिका किंवा ईव्हीएममध्ये उमेदवारासोबत NOTA (None of the Above) हा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत राज्य निवडणूक आयोग आणि भारत निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्यात यावी. “एकच उमेदवार असला तरी मतदान घ्या; NOTA चा पर्याय द्या” – नगरसेवक अजय धोबे यांची मागणी . “एकच उमेदवार असला तरी जनतेचा कौल घ्या; लोकशाहीत बिनविरोध संस्कृतीला आळा घाला”

नामदार संजय राठोड यांच्या चाणक्य नीती चे यश.
विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्यानंतर उर्वरित अपक्ष उमेदवारांनी सुद्धा आपले अर्ज निवडणुकीच्या रिंगणातून मागे घेतल्यामुळे महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. या घडामोडी मध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड फेर बदल दिसून येतो, प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या असतील. स्पर्धेच्या युगात प्रचंड रस्सीखेच पहावयास मिळते, परंतू हे सर्व घडवुन आणण्यात महत्वाची भुमिका चाणक्य नीति नामदार संजय राठोड यांची असून निश्चितच त्यांचा सिंहाचा वाटा आहे.












