विजेच्या खांबावरून पडून खाजगी लाईनमन चा मृत्यू नवरगाव येथिल घटना.
आनंद नक्षणे- मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे राहणारे ४५ वर्षीय गणेश नारायण नागपुरे यांचा विजेच्या खांबावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. नवरगाव येथील एका घरातील विजेची लाईन दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात ते खांबावर चढले होते. यावेळी त्यांना विजेचा धक्का बसून ते जमिनीवर कोसळले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दि. २५ जुलै रोज गुरुवार रोजी सकाळी ८:३० सुमारास घटना घडली.
खेडोपाडी खाजगी लाईनमन सर्हास विद्युत दुरुस्तीची कामे करीत असतात. बेजबाबदार विद्युत पारेषण अधिकाऱ्यांच्या कामचलाऊ धोरणामुळे अश्या घटनेत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
गणेश नागपुरे हे खाजगी लाईनमन म्हणून काम करीत होते. येथील एका लाईनमनच्या हाताखाली ते काम करीत होते. दुर्घटनेच्या वेळी तेच लाईनमन त्यांना खांबावर चढवत होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली, सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोलीस प्रशासन चौकशी करीत आहे.
या दुर्घटनेने नवरगाव गावात शोककळा पसरली आहे. गणेश नारायण नागपुरे यांच्या मागे आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून या घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. विजेच्या धक्क्यामुळेच मृत्यू झाला की अन्य वेगळे कारण होते, याचा तपास सध्या तरी सुरू आहे.