पिंपळखुटी चेक पोस्ट वर खाजगी कर्मचाऱ्यांच्या मार्फत वसुली.
लाच लुचपत विभागाचे धाडीचा धाक साहेब ऑफिस मध्ये तर फंटर वसुलीवर….
परवेज खान – पांढरकवडा.
आरटीओच्या महाराष्ट्र-तेलंगणा राज्य सीमेवरील पिंपळखुटी चेक पोस्टवर ‘वसुली’साठी तब्बल ७० च्या वर खासगी कर्मचारी नियुक्त आहेत. या वसुलीतून प्रत्येक आठ तासाच्या शिप्टमध्ये तब्बल लाखो रुपयांचा ‘गल्ला’ गोळा केल्या जातो. पिंपळखुटी चेक पोस्ट अद्यावत पद्धतीने तयार केले आहे. प्रत्येक वाहनाचे वजन करून रितसर पावती देणे बंधनकारक आहे. वाहन तपासणीवर अधिकाऱ्यांना बसल्या जागी नियंत्रण ठेवता यावे म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. काही मीटर अंतरापर्यंत कॅमेरांचा वॉच असतो. परंतु प्रत्यक्षात या कॅमेरांपासून दूर जाऊन या चेक पोस्टची ‘वसुली’ केली जाते. या वसुलीसाठी तेथे एक दोन नव्हे तर तब्बल ७० च्या वर खासगी कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. प्रत्येकी आठ तासाच्या ड्युटी शिप्टमध्ये या कर्मचाऱ्यांकडून वसुली करून घेतली जाते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप झाल्यास रंगेहात सापडू नये, म्हणून आरटीओ अधिकाऱ्यांनी खासगी कर्मचारी नेमण्याची ही खास सतर्कता बाळगली आहे. हे कर्मचारी संगणकात एन्ट्री करण्याऐवजी वाहनधारकांना हस्तलिखित पावत्या देतात. त्याचा कुठेच हिशेब शासन स्तरावर दाखविला जात नाही.
पांढरकवडा, पिंपळखुटी व पाटणबोरी येथील या कर्मचाऱ्यांचे म्होरके आहेत. त्यांच्या हाताखाली प्रमुख ४० कर्मचारी आणि याच्या खाली हाताखाली ३० दंडेघारी असे एकूण ७० कर्मचारी चेक पोस्टवर कार्यरत असून उधम माजवत आहे.
हस्तलिखित पावत्यांद्वारे होणाऱ्या या वसुलीतील २४ तासात लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने .या मासिक वसुलीतून लाखो रुपयांचे वाटप हे राजकीय पुढारी, कार्यकर्ते व माध्यमांपर्यंत केले जाते. उर्वरित रक्कम ही आरटीओतील यंत्रणा आपल्या पदाच्या दर्जानुसार आपसात वाटून घेत असल्याचे सांगण्यात येते. या वसुलीतून येथे कार्यरत खासगी कर्मचाऱ्यांनी (एडीसी) कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमविली आहे. खासगी कर्मचाऱ्यांची ही ‘उलाढाल’ पाहता आरटीओच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा आकडा किती मोठा असेल याचा सहज अंदाज येतो. या चेक पोस्टवरून गोवंश, जनावरांचे मांस, गुटखा, अफु- चरस-गांजा व अन्य अवैध मालाची मोठ्या प्रमाणात ने आण होते. चेक पोस्टच्या मेहरबानीतूनच ही पासिंग केली जाते. पिंपळखुटी चेक पोस्टवर महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांची ‘उलाढाल’ होत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेथे एकही ट्रॅप यशस्वी करू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते. यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लक्ष देऊन कारवाई ची मागणी ट्रक चालकांकडून होत आहे.