नगर वाचनालय वणी येथे साने गुरुजींची जयंती साजरी.
लोकवाणी जागर वणी:- महाराष्ट्राची माऊली म्हणून ज्यांची ओळख आहे.’खरा तो एकची धर्म!, जगाला प्रेम अर्पावे’!!...अशी सुंदर प्रार्थना लिहिणारे आणि आईचं हृदय घेऊन जनसामान्यांवर प्रेम करणारे पूज्य साने गुरुजी यांची आज शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती. त्या साने गुरुजींची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती नगर वाचनालयात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ व मित्र मंडळाच्या वतीने साने गुरुजींची प्रतिमेला हारार्पन करण्यात आले. त्यानंतर विदर्भ साहित्य संघाचे स्थानिक सचिव प्रा. अभिजीत अणे यांनी ‘ खरा तो एकची धर्म ‘ हे गीत सादर केले. नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार मार्गदर्शन करताना म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य लढ्याने प्रेरित होऊन आपले आयुष्य गुरुजींनी देशासाठी समर्पित केले.खऱ्या धर्माची व्याख्या गुरुजींनी किती सुंदर केली आहे.सर्वांनाच प्रेम द्या.हे प्रेम शिकविणारी “श्यामची आई” आज आपल्या घरातून हरविली आहे. घरात ती पुन्हा आणू आणि आपल्या मुलांना वाचायला देवू. आपणही वाचू.”बल सागर भारत” होण्यासाठी ते गरजेचे आहे.
या प्रसंगी विदर्भ साहित्य संघाचे स्थानिक अध्यक्ष प्रा. दिलीप अलोणे, मित्र मंडळाचे अध्यक्ष उत्तमराव गेडाम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक हरिहर भागवत, प्रा. स्वानंद पुंड, राजाभाऊ पाथ्रडकर, गजानन कासावार, विनोद ताजने, सुनील वाटेकर, वैजनाथ खडसे, वाचनालयाचे देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार, सुनीता राठोड इत्यादी उपस्थित होते.