अधिक टन क्षमतेच्या वाहनांमुळे रस्त्याची संपूर्णतः दुरावस्था – शिवसेनेच्या आंदोलनाला यश.
बुधवार पासून नवीन रस्त्याचे काम सुरु होणार. आमदार संजय देरकर यांनी सार्वजानिक बांधकाम विभागाचे सचिव यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून दिली माहिती.
राजु तुरणकर – संपादक.
वेळाबाई परिसरातील मुख्य रस्ता केवळ कमी टन क्षमतेच्या वाहनां साठीच तयार करण्यात आलेला असताना, गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावरून अधिक टन क्षमतेची जड वाहने सातत्याने धावत होती. या अतीभार वाहतुकीमुळे रस्ता पूर्णतः खराब झाला होता. नागरिकांना दररोज धुळीचा त्रास, वाहतुकीतील अडथळे आणि अपघाताचा धोका सहन करावा लागत होता. या रस्त्याची सध्याची स्थिती इतकी खराब झाली होती की, तो कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीस योग्य राहिलेला नव्हता.
गावकऱ्यांचा संयम अखेर संपुष्टात आला आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रमुख संजय निखाडे व वेळाबाई येथील तुळशीराम बोबडे, उलामले सर, प्रविण बांदुरकर, श्रीकांत डाहुले, मनोज ताजने, विपुल सोंडवले, किशोर शंकावार, रामराव वडस्कर, नागोबा बोबडे व ग्रामस्थ यांनी व वणी तालुक्यातील शिवसैनिकांनी मिळून वेळाबाई येथे ठिय्या आंदोलन सुरू करून 6 मे पासुन संपूर्ण जड वाहतुकीला बंदी घालून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.
सदर आंदोलन शांततेत पार पडले असून, या काळात केवळ शालेय बस, अत्यावश्यक सेवा, प्रवासी वाहतूक आणि लहान खासगी वाहनांना मोकळीक देण्यात आली होती. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांनी केले. आमदार संजय देरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शेवटी आमदार संजय देरकर यांच्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेतला.
आमदार देरकर यांनी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव साळुंके यांच्याशी फोन च्या माध्यमातून चर्चा करून कार्यकारी अभियंत्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करत लेखी आश्वासन देत बुधवारपासून वेळाबाई रस्त्याचे नवीन बांधकाम सुरू करण्यात येत असल्याचे सांगीतल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
गावकऱ्यांची एकजूट, शिवसेनेचे सक्रिय नेतृत्व, आणि संयमाचा हा विजय आहे. हा लढा केवळ रस्त्यासाठी नव्हे, तर गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी होता. प्रशासनाने यानंतर अशा अतीभार वाहतुकीवर योग्य नियंत्रण ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.