नगरसेवकाला शुल्लक कारणावरून ठाण्यात बोलावून मारहाण.

0
899

वेळेचे बंधन न पाळता कायदा सुव्यवस्था हातात घेणे नगरसेवकाला पडले महागात. ठाणेदार संतप्त.

तर ठाणेदाराने सुद्धा जनप्रतिनिधीला ठाण्यात बोलावून शुल्लक कारणावरून मारणे, कायद्याच्या चौकटीत बसत काय?….. उलट सुलट चर्चा… तर राजकारण तापण्याची शक्यता. राष्ट्रीय काँग्रेसने दिले पोलीस प्रशासनाच्या समर्थनार्थ निवेदन.

आनंद नक्षणे —मारेगाव

मारेगाव : स्थानिक प्रभाग क्रमांक 16 मधील दुर्गादेवीचे विसर्जन सुरु असताना आणखी वेळेसाठी 20 मिनिटे वाजवू द्या, मात्र वेळ मागल्यानंतर मारेगाव येथील भाजपाचे नगरसेवक राहुल राठोड यांना ठाण्यात बोलाविले आणि कॅबिनमध्ये ठाणेदारांनी मारहाण केली. हा घडलेला प्रकार पिडीत नगरसेवक यांनी आमदार यांना कळविला.. … मारहाण का? आणि कशासाठी ? हा प्रश्न करित आमदार व पदाधिकारी कार्यकर्त्यांसह काल ठाण्यात पाच तास ठिय्या मांडून ठाणेदार जनार्दन खंडेवार यांची तात्काळ उचलबांगडी करण्याची मागणी रेटून धरण्यात आली होती.

शहरातील प्र. क्र.16 मधील सार्वजनिक दुर्गादेवी विसर्जन शुक्रवारी करण्यात आले. यात अनेक युवक नाचत असतांना पोलीस प्रशासनाचा आदेशानुसार विहीत वेळ संपल्याचे आदेश तोंडी स्वरूपात देण्यात आले. मात्र, मंडळांनी विनंतीवजा करीत 20 मिनिटांचा अधिकचा वेळ मागितला. विहीत वेळ संपताच ध्वनिक्षेपक बंद करण्यात आले. परंतु ठाणेदार यांनी नगरसेवक राठोड यांना स्टेशनला बोलावून घेत कॅबिनमध्ये अकारण शिवीगाळ करीत जबर मारहाण केल्याचा राठोड यांचा आरोप आहे. यात राठोड यांच्या पाठीला मारण्याचे व्रण असल्याने ठाणेदाराप्रती सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. हा संताप थेट ठाण्यात पोहचला आणि तब्बल पाच तास ठिय्या मांडण्यात आला.

दरम्यान, काल शनिवारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचेसह पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येत रोष व्यक्त करित उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचेकडे ठाणेदार उचलबांगडीची मागणी लावून धरली. ही मागणी पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड यांचेशी भ्रमणध्वनी वर सांगितली. मात्र, त्यांनी पारदर्शक चौकशी करून सकारात्मक निर्णय घेण्याचे अभिवचन दिले. परिणामी यावर समाधानकारक निर्णय न झाल्याने आमदार बोदकुरवार यांनी एसपी सोबत चर्चा करून उचलबांगडीची मागणी रेटून धरली अन्यथा, ठाणेदार विरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा गर्भित ईशारा देण्यात आला. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून, सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या माध्यमातून उचलबांगडीची दिशा ठरणार आहे. ठाणेदार हे यवतमाळ मिटिंग ला गेल्याने त्यांचा मुक्काम चार दिवस जिल्हास्थळी राहणार आहे. त्यांच्या अनुपस्थितीत या प्रकरणाची चौकशी होणार आहे.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, लोकसभा विस्तारक रवी बेलूरकर, जिल्हा संघटक नितीन भुतडा, मारेगाव भाजप तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर , शहअनुप महाकुळकर चिकटे, जिल्हा सरचिटणीस शंकर लालसरे, पदाधिकारी अविनाश लांबट, प्रशांत नांदे, पिडीत नगरसेवक राहुल राठोड बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

आमदार बोदकुरवार यांच्या नेतृत्वात पोलीस ठाण्यात तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
हे प्रकरण आता तापण्याचे संकेत आहे. पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या ताठर भूमिकेने प्रकरण कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता तिसरा डोळाच उचलबांगडी साठी दगडाचा मैल ठरणार असला तरी या निमित्ताने गावातील राजकारण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ठाणेदराच्या समर्थनार्थ निवेदन दिले आहे.

एकंदरीत दुर्गामातेच विसर्जन साठी अनेक शहरात, गावात उशीर होतोच, मात्र वेळ वाढवून देवून सुद्धा एका जनप्रतिनिधीला ठाण्यात बोलावून मारणे ही अतिशय गंभीर बाब जरी असली तरी हा मुद्दा समजण्याच्या पलीकडे आहे. तत्पूर्वी काही शब्दिक वाद झाला काय? की पडद्यामागे काही वेगळी भूमिका आहे काय? यावरून शहरात चर्चेला उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here