वादग्रस्त पुतळा हलविल्यानंतर मारेगावात तणावपूर्ण शांतता, चर्चेला उधाण….
मारेगाव पोलीस ठाण्यासमोरच पुतळ्याची स्थापना झाल्याने प्रशासनाची धावपळ.
राजु तुरानकर – वणी
महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला मारेगाव शहरातील मार्डी चौक येथे छञपती शिवाजी महाराजांच्या यांच्या अर्धाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली. ही स्थापना काही शिवभक्तांनी रात्रीच्या वेळी केल्याची चर्चा, माहिती समोर आली आहे.
सकाळी ही बाब मारेगावकरांच्या निदर्शनास येताच शहरात एकच खळबळ उडाली असून हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. विशेष म्हणजे हा पुतळा स्थानिक पोलीस ठाण्यासमोरच उभारण्यात आल्याने प्रशासनाच्या सतर्कतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. पुतळ्याच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनावर आली होती.
मारेगावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची शिवभक्तांनी उत्साहात स्थापना केली होती. मात्र, पुतळ्याच्या ठिकाणावरून वाद निर्माण झाल्याने प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करत तो पुतळा हलविण्याची कारवाई केली.
या निर्णयामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु प्रशासनाने योग्य समन्वय साधत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या गावात पूर्णतः शांतता असून नागरिकांमध्ये सलोखा कायम आहे.

स्थानिकांनी देखील संयम राखत कायदा व सुव्यवस्थेला सहकार्य केले, त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
सध्या गावात शांततेचे वातावरण असून, पोलीस प्रशासनामार्फत नागरिकांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












