३६ वर्षांचा उदरनिर्वाह उद्ध्वस्त;  निवडक अतिक्रमणावर मात्र मौन.

0
437

वणी नगरपरिषदेची मनमानी कारवाई ! ३६ वर्षांचा उदरनिर्वाह उद्ध्वस्त;  निवडक अतिक्रमणावर मात्र मौन.

कोणतीही लेखी पूर्वसूचना न देता केलेल्या कारवाई मुळे कपडे प्रेस करणाऱ्या गरीब व्यवसायिकावर उपासमारीची वेळ.

राजु तुरणकर वणी : शहरातील विठ्ठलवाडी परिसरात नगरपरिषद प्रशासनाच्या कथित मनमानी कारवाईमुळे एका कष्टकरी नागरिकाचा ३६ वर्षांचा उदरनिर्वाह एका दिवसात उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिलीप दशरथ मोतेकर या नागरिकाने गंभीर आरोप करत प्रशासनाकडून न्यायाची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोतेकर हे विठ्ठलवाडी येथे मागील ३६ वर्षांपासून कपडे प्रेस करण्याचा व्यवसाय करत होते. हा त्यांचा एकमेव उदरनिर्वाहाचा स्रोत आहे. मात्र दि. २६ एप्रिल रोजी दुपारी, त्यांचे दुकान बंद असताना नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना, नोटीस किंवा माहिती न देता त्यांचा लोखंडी ठेला जबरदस्तीने हटवून फेकून दिला.
या घटनेत ठेल्यामध्ये ठेवलेली अंदाजे ₹७०० रोख रक्कम, ग्राहकांचे महागडे कपडे तसेच पितळी प्रेस गायब झाल्याचा आरोप मोतेकर यांनी केला आहे. घटनास्थळी साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले, मात्र रोख रक्कम मिळाली नसल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.
या कारवाईमुळे मोतेकर यांचे आर्थिक नुकसान झाले असून ग्राहकांपुढे त्यांची प्रतिमा देखील मलिन झाली आहे. “कोणतीही नोटीस न देता अशी कारवाई करणे म्हणजे सरळ अन्याय आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे गणेश गृहनिर्माण सोसायटी परिसरातील एका सरकारी कर्मचाऱ्याचे अतिक्रमण आजतागायत कायम असून त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन निवडक व पक्षपाती कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
मोतेकर यांनी नगरपरिषदेला ३ दिवसांत लेखी खुलासा देण्याची मागणी केली असून, झालेल्या नुकसानीची भरपाई व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा न्यायालयीन लढा व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता नगरपरिषद या प्रकरणावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here