मुख्याधिकाऱ्यांच्या कारभारावर गंभीर आरोप, चौकशीची मागणी.
वणी : नगरपरिषद वणी येथील मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील कथित अनागोंदी कारभार, आर्थिक अनियमितता आणि जनहिताला बाधा आणणाऱ्या निर्णयांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे गंभीर तक्रार दाखल करण्यात आली असून, या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
माहिती अधिकारातून समोर आलेल्या कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलेल्या या तक्रारीत दुभाजकात झाडे लागवड, अतिक्रमण आणि दूषित पाणीपुरवठा या तीन प्रमुख मुद्द्यांवर थेट आरोप करण्यात आले आहेत.
झाडे कागदावरच, निधीचा अपव्यय ?
दुभाजकात महागडी झाडे लावल्याचे बिल दाखवून प्रत्यक्षात कमी किमतीची किंवा निविदेत नसलेली झाडे लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. लाखो रुपयांचा खर्च दाखवूनही प्रत्यक्षात कामात तफावत आढळल्याने शासनाच्या निधीच्या अपव्ययाचा संशय व्यक्त केला जात आहे.
अतिक्रमणावर कारवाई शून्य—प्रशासन मूकदर्शक?
गणेश गृहनिर्माण सोसायटी परिसरातील मोठ्या अतिक्रमणाबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. किरकोळ प्रकरणांवर तत्परता दाखवणारे प्रशासन मोठ्या उल्लंघनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
दूषित पाणीपुरवठा—नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?
गुरूनगर परिसरात दूषित पाणीपुरवठ्याची गंभीर तक्रार करूनही पाणी तपासणी किंवा जबाबदारी निश्चितीबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या सर्व प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर संबंधित मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्य











