“जीवावर बेतले तरी मागे हटणार नाही!” — पत्रकार सचिन मेश्राम सहपरिवार आमरण उपोषणावर.
पत्रकारावर जीवघेणा दबाव, प्रशासन मौनात — सचिन मेश्राम यांच्या आमरण उपोषणाला ‘लोकवाणी जागर’ चा पाठिंबा.
राजु तुरानकर – संपादक.
वणी : मारेगाव तालुक्यातील आपटी रेती घाटावर सुरू असलेल्या कथित अवैध रेती उपसा, ऑनलाईन रॉयल्टी चोरी आणि पत्रकाराला जीवे मारण्याच्या धमकीच्या गंभीर प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार सचिन मेश्राम हे २४ एप्रिलपासून कुटुंबासह मारेगाव येथे आमरण उपोषणाला बसले आहेत.
मराठी न्यूज पोर्टल *‘लोकवाणी जागर’*तर्फे मेश्राम यांनी सहपरिवार लोकशाही मार्गाने सुरू केलेल्या या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. रेती घाटावर पोकलेन मशीन, जेसीबी आणि मोठ्या हायवा वाहनांच्या माध्यमातून नदीपात्रातून अनैसर्गिक पद्धतीने रेती उपसा सुरू असल्याचा आरोप करण्यात येत असून, हा उपसा लिलावाच्या अटींच्या बाहेर जाऊन होत असल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि रेती घाट कंत्राटदार यांच्यात संशयास्पद संगनमत असल्याचा गंभीर आरोपही पुढे आला आहे.
दरम्यान, प्रहार जनशक्ती संघटनेनेही या प्रकरणाची दखल घेत “दोन दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू,” असा थेट इशारा दिला आहे.
स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे सांगत सचिन मेश्राम यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली—“मला संपवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यापेक्षा प्रशासनासमोर उपोषण करून त्यांच्या निष्क्रियतेचा पर्दाफाश करत मरण पत्करेन,” असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे.
दरम्यान, धमकी देणाऱ्या रेती घाट कंत्राटदाराची ऑडिओ क्लिप समोर आल्याचा दावा करण्यात येत असून, त्या आधारे सखोल चौकशी करून संबंधित रेती घाट तात्काळ बंद करावा आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी लोकवाणी जागरचे संपादक राजू तुरणकर यांनी केली आहे.
प्रशासन कारवाई करणार की पुन्हा एकदा डोळेझाक? हा सवाल आता नागरिकांमधून अधिक तीव्रतेने उपस्थित होत आहे.












