वणी प्रभाग क्र. १२ मधील पालिकेच्या ट्युबवेलचा खाजगी वापर ?

0
291

वणी प्रभाग क्र. १२ मधील पालिकेच्या ट्युबवेलचा खाजगी वापर ? भीमसेनेचा गंभीर आरोप.
चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी.

राजू तुरणकर – वणी शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये नगरपालिकेच्या मालकीच्या ट्युबवेलचा खाजगी कामासाठी वापर केला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

वणी नगर परिषदेच्या अधिपत्याखाली मोक्षधामच्या मागील बाजूस असलेला ट्युबवेल सेवानगरच्या मागील भागासह मोक्षधाम समोरील बरडपूरा परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी वापरण्यात येत होता. मात्र, गेल्या अंदाजे तीन वर्षांपासून हा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला असून, सदर ट्युबवेलचे पाणी जनते ऐवजी मोक्षधाम लगत असलेल्या मोकळ्या जमिनीवर ओलितासाठी वापरले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या प्रकाराबाबत नगर परिषद प्रशासन व पाणीपुरवठा ठेकेदारांना माहिती नसणे अशक्य असून, त्यांच्या संगनमतानेच हा प्रकार सुरू असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, नगरपालिकेच्या ट्युबवेलच्या चाव्या खाजगी व्यक्तींच्या ताब्यात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच वीजबिलाचा भरणा नगरपालिका करत असताना, त्याचा फायदा नेमका कोण घेत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून ट्युबवेलचे कनेक्शन वळविणाऱ्या दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच आजपर्यंतचा विद्युत खर्च व पाणीकर वसूल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच संबंधित पाणीपुरवठा ठेकेदारावरही कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या संदर्भात प्रभागातील ५० पेक्षा अधिक नागरिकांच्या सह्यांनी तक्रार निवेदन सादर करण्यात आले. यावेळीरविंद्र उर्फ बबलूभाऊ मेश्राम (वणी विधानसभा अध्यक्ष) आणि हरीश पाते (वणी तालुका अध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here