OBC जातनिहाय जनगणनेचे गाजर; सरकारकडून दिशाभूल?” – प्रवीण खानझोडे

0
263

“OBC जातनिहाय जनगणनेचे गाजर; सरकारकडून दिशाभूल?” – प्रवीण खानझोडे.

विरोधी पक्ष असो किंवा विविध OBC संघटना, जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर मूंग गिळून गप्प. “घरगणना की OBC समाजाची दिशाभूल?”

वणी, प्रतिनिधी : सन २०२७ च्या जनगणनेत इतर मागासवर्गीय (OBC) समाजाची जातनिहाय गणना स्पष्टपणे समाविष्ट करण्यात यावी, तसेच या संदर्भात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात यावा, या मागणीसाठी आज उपविभागीय अधिकारी, वणी यांच्या मार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले.

लढा संघटनेचे प्रवीण खानझोडे यांनी आरोप केला की, सरकार जातनिहाय जनगणनेची घोषणा करत असताना प्रत्यक्षात घरगणनेच्या माध्यमातून OBC समाजाची दिशाभूल केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या घरगणनेच्या प्रश्नावलीमध्ये एकूण ३३ प्रश्न असून त्यातील संबंधित रकान्यात सामाजिक गट/जातीचा प्रवर्ग असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांचा स्पष्ट उल्लेख असताना OBC समाजासाठी स्वतंत्र उल्लेख करण्यात आलेला नाही.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला होता. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही यासंदर्भात माहिती दिली होती. मात्र भारताचे महानिबंधक कार्यालयाने २२ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात OBC समाजाचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

“सरकारने जातनिहाय जनगणनेची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात OBC समाजाला स्वतंत्र ओळख न देता ‘इतर’ या प्रवर्गात टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे. OBC समाजाच्या जातनिहाय गणनेबाबत स्पष्ट सूचना देऊन सुधारित राजपत्र प्रसिद्ध करावे,” अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी लढा संघटनेचे प्रवीण खानझोडे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी मोठमोठ्या सभा, बैठका, संमेलने घेणारे, मोठी पदे भूषवणारे आणि समाजाविषयी प्रचंड कळवळा असल्याचे दाखवणारे अनेक नेते व संघटना आज कुठे आहेत? प्रत्यक्ष जनगणना प्रक्रिया सुरू असताना OBC समाजाचा स्पष्ट उल्लेख नसल्याबाबत कोणीही आवाज उठवत नाही. त्यामुळे हा कळवळा खरा आहे की केवळ राजकीय दिखावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.”खानझोडे पुढे म्हणाले, “विरोधी पक्ष असो किंवा विविध OBC संघटना, जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर आज ते मुग गिळून का बसले आहेत? OBC समाजाला न्याय मिळावा यासाठी फक्त व्यासपीठावर भाषणे करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष जनगणना प्रक्रियेत समाजाची स्वतंत्र नोंद होण्यासाठी संघर्ष करावा लागेल. अन्यथा OBC समाजाची पुन्हा एकदा फसवणूक झाल्याची भावना निर्माण होईल.”

यावेळी प्रवीण खानझोडे, सुरेश मांडवकर, राजू तुराणकर, सुरेंद्र घागी, वासुदेव पारखी, रवींद्र उपरे, रेव्ह. रोशन मलया गारपेल्लीवर, नियाज अली, जफर खान, विजय बोबडे, आकाश दुबे, मोहन महाकुळकर (परमडोह), गौरव वाभिटकर (परमडोह) यांच्यासह अनेक OBC बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here