वणीतील राजकीय पुढारी व्यवस्थेचा भाग झाले काय? जनतेच्या प्रश्नावर मौन….

0
582

वणीतील राजकीय पुढारी व्यवस्थेचा भाग झाले काय?      जनतेच्या प्रश्नावर मौन, मात्र  इव्हेंट मॅनेजमेंटवर जोर…

वणी विधानसभा क्षेत्रातील राजकीय पक्षांच्या चळवळी आणि चळवळीतील नेते गप्प.

वणी विधानसभा क्षेत्रात आज एक गंभीर प्रश्न सामान्य जनतेच्या मनात घर करू लागला आहे — राजकीय पुढारी जनतेसाठी लढत आहेत की व्यवस्थेचा भाग बनले आहेत?

शहरात अवैध मटका, गुटखा विक्री, तसेच एमडी ड्रग्जसारख्या घातक पदार्थांचा उघडपणे व्यापार होत असल्याच्या चर्चा सर्वत्र आहेत. पोलिसांकडून अधूनमधून कारवाई होताना दिसते, मात्र या अवैध धंद्यांविरोधात कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने सातत्याने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत नाही.

नगरपरिषदेमध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता, घंटागाडी, वृक्षसंवर्धन आणि विविध विकासकामांच्या निविदांबाबत सातत्याने तक्रारी होत असतात. नागरिकांकडून अनियमिततेचे आरोप होत असतानाही राजकीय पक्षांकडून ठोस आंदोलन किंवा पाठपुरावा दिसून येत नाही.

ग्रामीण रुग्णालयाची परिस्थितीही वेगळी नाही. डॉक्टरांची अनुपस्थिती, औषधांचा तुटवडा, किरकोळ कारणांसाठी रुग्णांना रेफर करणे, अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. मात्र या प्रश्नांवरही राजकीय नेतृत्वाचा दबाव किंवा संघर्ष क्वचितच दिसून येतो.

महसूल विभागात जमिनीच्या व्यवहारांबाबत, नोंदींमधील त्रुटींबाबत आणि कारभारातील कथित दिरंगाईबाबत तक्रारी होत असतात. अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असल्याची चर्चा आहे. तरीही या विषयांवर प्रभावी राजकीय नेते आवाज उठताना दिसत नाही.

मग प्रश्न असा निर्माण होतो की, वणीतील राजकीय नेतृत्व हे केवळ उद्घाटने, सत्कार, वाढदिवस, सोशल मीडिया पोस्ट आणि इव्हेंट मॅनेजमेंटपुरतेच मर्यादित राहिले आहे का?

वणी विधानसभा क्षेत्रातील राजकीय पक्षांच्या चळवळी आणि चळवळीतील नेते गप्प झाल्याचे विदारक वास्तव चित्र निर्माण झाले आहे, सामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर संघर्ष करण्याऐवजी व्यवस्थेशी जुळवून घेण्याचा मार्ग निवडला जात आहे का?

जनतेच्या समस्यांना घेवून कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता रस्त्यांवर उतरून आंदोलन करतांना दिसुन येत नाही. प्रशासनाला वेठीस धरणारे, जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरणारे, रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे, अधिकाऱ्यांकडून उत्तरदायित्वाची मागणी करणारे नेतृत्व आज दुर्मिळ होत चालले आहे, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकशाहीत राजकीय नेतृत्वाची भूमिका केवळ निवडणुका लढवणे नसून जनतेचा आवाज बनणे ही असते. त्यामुळे वणीकरांच्या मनातील हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे —

“राजकीय पुढारी जनतेसाठी आहेत की व्यवस्थेच्या सोयीसाठी?”

हा प्रश्न आता केवळ चर्चेचा नाही, तर लोकशाहीच्या आरशात पाहण्याचा विषय बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here