मारेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.
आठवड्यातून तीन दिवस चालतो खुलेआम अवैध कोंबड बाजार — खाकी वर्दीचा आड अर्थकारन.
राजू तुरणकर मारेगाव : मारेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था प्रत्यक्षात अस्तित्वात आहे की केवळ कागदोपत्री उरली आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कारण मंगळवार, शुक्रवार व रविवार या ठरावीक दिवशी अवैध कोंबड बाजार नियमितपणे भरत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत असतानाही, त्यावर ठोस व परिणामकारक कारवाई होताना दिसून येत नाही.
कोंबड्यांची झुंज (Cockfighting): हा खेळ कायद्याने प्रतिबंधित आहे. यामध्ये कोंबड्यांना लढवून जुगार खेळला जातो, जे प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा आहे. याचा मारेगाव पोलीसांना विसर पडला काय, की खाकी वर्दीच्या आड अर्थकारण जनतेच्या पोलिसांवरील विश्र्वास…?
कुंभा परिसरातील शिवनाळा पोड, वेगाव गावालगतचा भाग तसेच झमकोला जंगल परिसर येथे आठवड्यातून तीन वेळा कोंबड्यांच्या झुंजी, जुगार, दारू सेवन, रोख पैशांचे व्यवहार आणि त्यातून होणारे वाद–भांडणे खुलेआम सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत. हा प्रकार एखाद्या क्षणिक दुर्लक्षाचा नसून, दीर्घकाळापासून ठरावीक पद्धतीने सुरू असलेला अवैध धंदा असल्याचे चित्र समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर “प्रशासनाला माहिती नव्हती” असा युक्तिवाद आता टिकणारा राहिलेला नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. आठवड्यातून तीन दिवस, ठरावीक ठिकाणी, मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला बेकायदेशीर प्रकार कायदा अंमलबजावणी यंत्रणेच्या नजरेतून सातत्याने सुटत असेल, तर ते अधिक गंभीर व चिंताजनक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे. महिलांमध्ये भीतीचे वातावरण, लहान मुलांवर होणारा मानसिक परिणाम आणि शांत गावपरिसरात हळूहळू वाढत चाललेली अराजकतेची छाया — हे सर्व भावी कायदा-सुव्यवस्थेच्या मोठ्या संकटाचे संकेत असल्याचे जाणकारांचे मत आहे.











