महिलांनी भयमुक्त जीवनासाठी महानायिकांचे विचार आत्मसात करावेत- वृषाली खानझोडे.
राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
राजू तुरणकर- हटवांजरी मारेगाव .
समाजातील प्रत्येक महिलांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वैचारिक वारसा डोळ्यासमोर ठेवून आपले जीवन उंचावावे. महिलांनी स्वाभिमान, आत्मविश्वास व निर्भयतेने जीवन जगण्यासाठी महानायिकांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वृषालीताई खानझोडे, माजी उपसभापती, वणी यांनी केले.
तालुक्यातील हटवांजरी येथे राजमाता जिजाऊ जयंती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. हा संयुक्त जयंती उत्सव महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), मारेगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्र, मारेगाव यांच्या पुढाकाराने गुरुवारी सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.













