वणीत सुगंधित तंबाखूवर आठ दिवसांची धडक मोहीम ?

0
1541

वणीत सुगंधित तंबाखूवर आठ दिवसांची धडक मोहीम ?

फूड अँड ड्रग अधिकाऱ्यांच्या आगमनाने पानटपऱ्या बंद – गुप्त संदेश देणारे कोण ? सुगंधित तंबाखू सापडल्यास मकोका लागणार ? 

राजू तुरणकर – वणी- संपूर्ण महाराष्ट्रात बंदी घालण्यात आलेल्या सुगंधित तंबाखूविरोधात वणी शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाने आठ दिवस तल ठोकून कारवाई करण्याचे संकेत दिल्याने शहरातील पानटपऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. फूड अँड ड्रग अधिकाऱ्यांच्या येण्याची चाहूल लागताच अनेक पानठेले आणि टपऱ्या अचानक बंद झाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले.

यामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे – अधिकाऱ्यांच्या येण्याची माहिती आधीच कोण देत आहे ? कारवाई पूर्वीच टपऱ्या बंद होणे हा केवळ योगायोग आहे की कुणाच्या गुप्त संदेशाचा परिणाम, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.

जीवघेणा खेळ सुरूच ?  सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीवर महाराष्ट्रात बंदी असताना देखील काही ठिकाणी खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. आरोग्यास अत्यंत घातक असलेल्या या पदार्थांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत आहे. तरीही हा जीवघेणा खेळ सुरूच असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न –  जर बंदी असलेला माल शहरात उपलब्ध होत असेल, तर तो येतो कुठून?  साठवणूक कोठे होते? पोलीस यंत्रणा याबाबत काय कारवाई करते ?

नियमांची सर्रास पायमल्ली होत असताना संबंधित विभाग आणि पोलीस अधिकारी नेमके काय करीत आहेत, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

कठोर कारवाईची मागणी – नागरिकांनी सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवरच नव्हे, तर पुरवठा साखळीतील मोठ्या माशांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केवळ दिखाऊ कारवाई न करता सातत्यपूर्ण तपास आणि बंदी असलेली सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणावर संघटित साखळीमार्फत विक्री होत असल्यास मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्त्वाचा मुद्दा – जर वणी शहरात सुगंधित तंबाखू विक्रीमागे संघटित रॅकेट कार्यरत असेल, आणि अधिकाऱ्यांच्या येण्याची माहिती आधीच लीक होत असेल, तर तपास यंत्रणांनी गंभीर दखल घेऊन चौकशी करणे आवश्यक आहे.

आता येत्या आठ दिवसांत प्रशासन किती प्रभावी मोहीम राबवते आणि गुप्त माहिती देणाऱ्यांचा पर्दाफाश होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here