महिला दिनानिमित्त मनसेने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान !
शहरांतील कष्टकरी महिलांना मनसेकडून साड्यांचे वाटप.
राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर
स्वतःच्या पायावर उभे राहताना, वेगळं काहीतरी करून दाखविताना समाजातील विविध घटकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा ही जेंव्हा ध्येय बनते. सातत्याने त्यादिशेनेच प्रत्येक पाऊल टाकले जाते, तेंव्हा असे कार्य समाजाला प्रेरणादायी आणि मार्गदर्शन करणारे ठरते. समाजातील अशाच कर्तुत्वाने मोठया असलेल्या अर्थात रस्त्याच्या कडेला खाद्य पदार्थ, जीवनावश्यक वस्तू व फळांची विक्री करुन संसाराचा गाडा हाकणाऱ्या महिलांचा सन्मान करीत महिला मनसेने साड्यांचे वाटप करुन महिला दिन साजरा केला.
८ मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिलांशिवाय, हे जग अपूर्ण आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज काम करत आहेत.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी मनसेच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये वणी शहरांत रस्त्याच्या कडेला बसून फळे, खाद्य पदार्थ, कपडे, फळे, फुले, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची विक्री करुन आपला संसार हाकणाऱ्या महिलांना मनसे महीला सेनेच्या वतीने साड्या, गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहरांतील शेकडो महिलांना ह्या साड्या देण्यात आल्या, यावेळी मनसे महीला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ. अर्चना बोधाडकर, शहराध्यक्ष वैशाली तायडे, विद्या हिवरकर, सिंधू बेसकर यांच्या सह मनसे महिला सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
जागतिक महिला दिनामुळे आज आपल्याला महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे हे प्रकर्षाने दिसून येते मात्र हे केवळ एक दिवसापूर्वी सीमित न राहता दररोज महिलांच्या कर्तृत्वाला वाव दिला पाहिजे आणि ती मानसिकता आपण जोपासली पाहिजे.असे मत जिल्हाध्यक्ष अर्चना बोधाडकर यांनी व्यक्त केले.
महिलांचा सन्मान.
महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. आज सर्वच क्षेत्रात महिलांचे पाऊल पुढे पडत आहे. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. हे जग सुंदर बनविण्यात स्त्रियांचा वाटा मोलाचा राहिलेला आहे. प्रत्येक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटत आहे.