मोदींच्या नेतृत्वात देशाची हुकूमशाही कडे वाटचाल: कुमार केतकर.
प्रभू श्री रामाच्या अपूर्ण मंदिराचे लोकार्पण म्हणजे हिंदू संस्कृतीचा अपमान , निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाई गडबडीत मंदिराचे लोकार्पण .
राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.
ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर वणी येथील प्रचार सभेत हल्लाबोल केला. “देशात लोकशाही पद्धतीनं निवडून येऊन हुकूमशाही लादायची,” अशी घणाघाती टीका कुमार केतकर यांनी केली. काँग्रेस पक्षाच्या चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या शेतकरी मंदिर लॉन वणी येथील प्रचार सभे दरम्यान मतदारांनी गांभीर्याने विचार करून मतदान करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 ला आणि 2019 ला पण निवडून आले, लोकशाही मार्गाने निवडून येवून सर्व क्षेत्रात मुस्कटदाबी करून लोकांना जेरीस आणून आपल्या विचार सरणीच्या विरोधात जाणाऱ्यांना प्रथम आपले सोबत घ्यायचे आणि ऐकत नसेल तर धरून दबायचे अश्या स्वरूपाची दडपशाही करायची, देशात हा प्रयोग सुरू झाला आहे. अतिशय उग्र आणि प्रकट स्वरूपात हे सर्व सुरू आहे. ही निवडणुकीतून आलेली हुकूमशाही आहे, असा हल्लाबोल ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी केला.
पंतप्रधान मोदी कुणाशीही संवाद साधत नाहीत. मतदारांच्या भरवशावर निवडून यायचं आणि यानंतर आपली मतं, धोरणं त्यांच्यावर लादायची. चर्चा करायची नाही. पक्षाचं तर सोडा पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळा सोबत देखील देखील चर्चा करीत नाहीत. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांशी तर त्यांचा संवादच नसतो. ते फक्त आपला कारभार प्रधानमंत्री कार्यालयातून पाहतात. त्यांचा प्रयत्न हा हुकूमशाही लादण्याचा आहे.”
तर मोदींना पंतप्रधान पद सोडावं लागेल “या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी सत्तेत येणार नाहीत. भाजपाला 200 च्या आतंच जागा मिळणार. त्यामुळे मोदींचे पंतप्रधान पदही जाणार. मात्र ते पंतप्रधानपद सोडणार नाहीत. यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करणार. म्हणूनच त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फोडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतलं, असंही कुमार केतकर म्हणाले.प्रचाराची इतक्या खालची पातळी बघितली नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं प्रचाराची खालची पातळी गाठली आहे. ज्या पद्धतीने भाजपा हा प्रचार करत आहे, अशी प्रचाराची पातळी भाजपानं यापूर्वी कधी गाठली नव्हती. अशा पद्धतीचा प्रचार करण्याची भाजपाची संस्कृती नव्हती. इतका वाह्यात, इतका फाजील आणि दडपशाही अशाप्रकारची पातळी मी कधीही पाहिलेली नाही.
अटलबिहारी वाजपेयींच्या काळातही असं कधी घडलं नाही. एक पत्रकार म्हणून मी 1971 पासून निवडणुकांचं वृत्तलेखन केलं आहे, मात्र असं पहिल्यांदा घडतं आहे की वृत्तपत्र बातम्या लीहणाऱ्याना सुद्धा डांबून ठेवले जात आहे. यावरून कुमार केतकर यांनी प्रतिक्रिया दिली.या फाजीलपणाचे मुख्य स्रोत पंतप्रधान मोदी 2014 आणि 2019 मध्ये भाजपंची सत्ता आल्यापासून त्यांनी सर्व प्रकारची नैतिकतेची आणि सभ्यतेची पातळी सोडून दिलेली आहे. आपल्याकडं पूर्ण बहुमत असल्यानं आपण काहीही करू शकतो, असा अहंकार भाजपामध्ये शिरला आहे. त्यामुळेच असा प्रचार दिसून येत आहे.
अपूर्ण राम मंदिराचे लोकार्पण हिंदू संस्कृतीनुसार शंकराचार्यांनी विरोध केल्यानंतरही लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदी यांनी या मंदिराचे उद्घाटन केले व निवडणुकांच्या घोषणा केल्या. मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना सुद्धा जुमानत नाही. त्यामुळे भविष्यामध्ये लोकशाही टिकवायचे असेल तर भाजपाला मतदान न करण्याचे आवाहन केतकर यांनी केले. याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी आमदार वामन कासावार, माजी आमदार विश्वास नांदेकर, शिवसेनेचे संजय देरकर, मराठा सेवा संघाचे अंबादास वाघदडकर व शेतकरी नेते राजीव मसे मंचकावर उपस्थित होते.