न.प.शाळा क्र. 7 ची विद्यार्थिनी वैष्णवी बघेल शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र.
शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकण्याची परंपरा कायम.
लोकवाणी जागर वृत्त .
वणी:- येथील नगर परिषद द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. 7 ची विद्यार्थिनी वैष्णवी सुदामा बघेल ही इयत्ता 5 वी मधून शहरी भागातून गुणवत्ता यादीत झळकली आहे. या शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकण्याची परंपरा कायम राखली आहे. मागील वर्षी या शाळेतील दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले होते. या विद्यार्थिनीचे अभिनंदन नगर परिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सचिन गाडे यांनी करून पुढील शैक्षणिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
नगर परिषद द्वारा संचालित मराठी व सेमी इंग्रजीच्या 9 शाळा, एक हिंदी व एक उर्दू माध्यमाची शाळा आहे. शाळा क्र. 7 मध्ये सेमी इंग्रजी माध्यमातून इयत्ता पहिली पासून शिकविल्या जाते. या शाळेत विविध शालेय व सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण प्रगती करण्यासाठी शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन कासावार यांच्या सह येथील शिक्षक वृंद मेहनत घेत आहेत. वणी तालुक्यातील संगणक प्रयोगशाळा असलेली एकमेव प्राथमिक शाळा आहे. यासाठी विशेष प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या विद्यालयात नियमित जादा वर्ग घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेतल्या जाते. त्याचेच फळ म्हणून दरवर्षी या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येतात.