महिलांसाठी भव्य स्तन कर्करोग तपासणी शिबिर…
गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था वणी व यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन.
राजू तुरणकर
वातावरणातील व खानपानाच्या आहारातील बदलामुळे महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंतेची बाब आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांच्या पुढाकाराने गुरुदेव नागरी सह. पतसंस्था वणी व यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्यूट, नागपूर यांच्या सहकार्याने मंगळवार 13 ऑगस्ट 2024 ला वणी येथील शेतकरी मंदिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाणार आहे. कर्करोग हा जीवघेणा आजार झाला आहे. हल्लीचे राहणीमान व विषारीयुक्त फळ-भाज्यांनी कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. यातही महिला या आजाराने जास्त बळी पडतात. घरकामात व्यस्त असलेल्या महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. या आजाराच्या तपासण्या महागड्या असल्याने सर्वसामान्यांना परवडनाऱ्या नाहीत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. महिलांमध्ये गर्भाशय व स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे महिलांना कर्करोगा पूर्वी तपासणी करता यावी, याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रा. टिकाराम कोंगरे यांनी दिली. शिबिराबद्दल अधिक माहिती करिता मेघश्याम तांबेकर, प्रमोद वासेकर, आशिष मोहितकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन संध्या बोबडे अध्यक्ष यवतमाळ जि.म.कॉ. कमेटी, सुरेखा लोडे अध्यक्ष, वणी ता. म. कॉ. कमेटी, शामा तोटावार, माया गाडगे अध्यक्ष मारेगाव, देवका येनगंटीवार अध्यक्ष झरी यांनी केले आहे.