रणरागिणी उतरल्या रस्त्यावर, पोलिस प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावर…
मारेगाव शहरासह गाव खेड्यात दारू विक्रेत्यांचा हैदोस; वनोजा देवी गावात महिलांनी पकडली दारू….
आनंद नक्षणे – मारेगाव.
मारेगाव तालुक्यातील वनोजा देवी येथे महिलांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध धाडसी पावले उचलली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला अध्यक्ष उज्वला चंदनखेडे मारेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी एकत्र येऊन या अवैध कारवायावर आळा बसवण्याचा निर्णय घेतला.
वनोजा देवी येथे दारूची विक्री बेकायदेशीरपणे चालू असल्याची माहिती महिलांना मिळाली. याबाबत स्थानिक पोलिसांकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी स्वतःच या प्रश्नावर उपाय शोधण्याचे ठरवले.
8 सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास महिलांनी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी अचानक ढाबा टाकून त्याला जाब विचारला. मात्र, त्या व्यक्तीने महिलांना शिवीगाळ करत तुच्छ भाषेत बोलण्यास सुरुवात केली. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी त्याच्याकडून दारूचा साठा जप्त केला आणि त्याच्यावर मनसे स्टाईलने चोप दिला.
या कारवाईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेगाव येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला तालुका अध्यक्ष उज्वला चंदनखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोशन शिंदे, युवा अध्यक्ष वणोजा देवी, उज्वला डोके, सीमा शिंदे, अनिता ढोके, माया कडूकर,, सिंधुबाई सोनटक्के, अर्चना सोनटक्के, उज्वला बर्डे, सोनू काळे, सुनंदा शिंदे, सुनिता सोनटक्के, लता लखमापूर, इंदिरा सोनटक्के, माया ढोके आदी महिलांनी सक्रिय भूमिका बजावली. अवैध दारू विक्री सारख्या समाज विघातक समस्यांविरुद्ध महिलांनी आंदोलनाचे शत्र उगारल्याने समाजात अवैध कारवायांविरुद्ध जागरूकता निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून राजकीय पुरुष मंडळीला सुद्धा राजकीय चिंतन करण्याची गरज या महिला रस्त्यावर उतरल्याने निर्माण झाली आहे.
वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मंदर येथील एका धाब्यावर अशीच अवैध दारू विक्री सुरू होती त्यामुळे परिसरातील संतप्त महिलांनी त्या ठिकाणी जाऊन दारू विक्रीसाठी विरोध केल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड तणाव निर्माण झाला होता व जाळपोळ झाली होती या घटनेचा तपास करतांना वणी पोलिसांनी उलट महिलांवर गुन्हे दाखल केले आहेत… याचा अर्थ पोलीस प्रशासन चोरांची बाजू घेण्यासाठी तत्पर असल्याचे दिसून येते.