शिक्षक आमदार हे पक्षाचे पद नाही
आमदार किरण सरनाईक मारेगाव येथे सहविचार सभेमध्ये काढले उद्गार.
आनंद नक्षणे — मारेगाव.
शिक्षक आमदार हे कोण्या पक्षाचे नसतात. त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नरत असावेत असे उद्गार शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी काढले. ते मारेगाव येथे संकेत जुनिअर कॉलेजमध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आयोजित शिक्षक सहविचार सभेमध्ये बोलत होते. यावेळी मंचावर भास्कर सोनवणे, दिलीप पाटील, विनोद जेणेकर, पुरुषोत्तम येरेकर, नंदकिशोर धानोरकर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार सरनाईक पुढे म्हणाले की, 30 ऑक्टोबरपासून मुंबई येथे सर्व शिक्षक संघटनांकडून मोठे आंदोलन उभे होणार आहे. प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षकांचा प्रलंबीत असलेला अनुदानाचा टप्पा यासाठी मागील 20 वर्षांपासून शिक्षक लढा देत आहे. तुम्हाला 100% अनुदान मिळावे हा तुमचा हक्क आहे. तुम्हाला याआधीच हा हक्क मिळायला हवा होता. अनेक शिक्षक बांधव, भगिनी ह्या ऊन, वारा, पाऊस झेलत मुंबईला आझाद मैदानावर आंदोलन करतांना बघीतले आहे. पोस्ट मॅपिंग न झालेल्यांचे पगार न करणे, शिक्षकांना अतिरिक्त न ठरवणे अशा अनेक मागण्या आम्ही शासनाकडे आधीच केलेल्या आहे. शिक्षकांच्या प्रलंबीत समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिक्षकांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला अनेकवेळा भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आंदोलन करूनही काही मिळत नाही ही शोकांतिका आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी नंदकिशोर धानोरकर आणि पुरुषोत्तम येरेकर यांनीही आपली मते व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम जाधव यांनी प्रास्ताविक अनंत आंबेकर तर आभार श्रीकांत लाकडे यांनी मानले. यावेळी चारही तालुक्यातील अंशता अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक उपस्थित होते.