कोण होणार वणी विधानसभेचा आमदार ? वीस उमेदवार रिंगणात…..
3 नोव्हेंबरला ठरणार, वणीच्या आमदारकीचे चित्र……
राजु तुरणकर – संपादक….
वणी विधानसभेच्या होवू घातलेल्या निवडणुकी करिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या 20 जणांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. यात भाजप, शिवसेना (महाविकास आघाडी), मनसे, बसपा, वंचित बहुजन आघाडी, सिपीआय, राष्ट्रीय गोंडवाना पक्ष, संभाजी ब्रिगेड , बिगर सातबारा संघटना तर काहीनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले.
वणी विधानसभा मतदार संघातून आमदारकी साठी विद्यमान आमदार संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार यांनी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून चार अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू मधुकरराव उंबरकर यांनी दोन तर महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना (उबाठा) चे संजय नीलकंठराव देरकर यांनीही दोन अर्ज दाखल केले.
याशिवाय अरुणकुमार रामदास खैरे (बसपा), राजेंद्र कवडूजी निमसटकर (वंचित बहुजन आघाडी), अनिल घनश्याम हेपट (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया), प्रवीण रामाजी आत्राम (राष्ट्रीय गोंडवाना पार्टी), अजय पांडुरंग धोबे (संभाजी ब्रिगेड पार्टी) यांनी माहविकास आघाडी सोबत युती तुटल्यामुळे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केला. अपक्ष उमेदवार म्हणून यशवंत शिवराम बोंडे, देवराव आत्माराम वाटगुरे बिगर सातबारा संघटना, सुनील गणपतराव राऊत, राहुल नारायण आत्राम, रत्नपाल बापूराव कनाके, निखिल धर्मा ठुर्के, केतन नथुजी पारखी, ऍडव्होकेट संतोष उद्धवराव भादिकर, आसिम हुसैन मंजूर हुसैन, हरीश दिगांबर पाते आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते नारायण शाहू गोडे इत्यादी उमेदवारांनी अर्ज भरले.
कांग्रेस महविकास आघाडीतील काँग्रेस पक्षातील तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले संजय खाडे यांनी कांग्रेस पक्षाच्या वतीने एक तर एक अपक्ष अशी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
आज बुधवार 30 ऑक्टोबर रोजी नाम निर्देशन पत्रांची छाननी होवून चुकीचे अर्ज बाद होतील आणि 3 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज परत घेण्याची तारीख आहे, यात काही मोठी राजकिय घडामोडी होण्याची शक्यता आहे, यावरून वणी विधानसभेच्या निवडणूक रिंगणात किती जण शिलक राहणार त्यानंतर विधानसभेचे आमदार कोण होणार हे चित्र स्पष्ट होईल…