शंकरबाबा पापळकर यांंची जैताई मातृगौरव पुरस्कारासाठी निवड.
वणी येथील जैताई देवस्थानच्यावतीने दिला जाणारा ‘जैताई मातृगौरव पुरस्कार’ यावर्षी वझ्झर (जि. अमरावती) येथील शंकरबाबा पापळकर यांना जाहीर.
राजू तूरणकर — वणी
आता पर्यंत बारा समाजसेवा समर्पित भगिनींना जैताई मातृगौरव हा प्रतिष्ठाप्राप्त पुरस्कार प्रदान केल्या नंतर या वर्षी पुरस्काराच्या तपपूर्ती निमित्त देवस्थानने वझ्झर येथील १२३ बेवारस दिव्यांग मुलांचे मातृपितृत्व स्वीकारलेया शंकरबाबा पापळकर यांंची जैताई मातृगौरव पुरस्कारासाठी सर्वानुमते निवड केल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष माधव सरपटवार व सचिव मुन्नालाल तुगनायत यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
या वर्षी विशेष स्वरूपात शंकरबाबांच्या दहावी नापास शंकर धोबी ते डॉ.शंकरबाबा पापळकर या भारावून टाकणार्या जीवनप्रवासाला मानवंदना देण्यासाठी पुरस्कारादाखल एक लक्ष रुपये, सन्मान चिन्ह व शाल, श्रीफळ प्रदान करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. संत गाडगेबाबांचा सहवास व प्रसाद स्वरूपात त्यांची घोंगडी लाभलेल्या व त्यांच्या शिकवणीनुसार आचरण करत असलेल्या शंकरबाबांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने डी.लिट्. पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे हे उल्लेखनीय.
८३ वर्षीय शंकरबाबांना हा पुरस्कार ९१ वर्षीय ज्येष्ठ समाजसेवक सुधाकर पुराणिक यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार देण्यातते स्वतः न स्वीकारता त्यांची लता मंगेशकर गायन पुरस्कार प्राप्त अंध मानसकन्या गांधारी हीच्या हस्ते स्वीकारणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य गजानन कासावार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम दि. १९ ऑक्टोबरला गुरुवारी दुपारी १ वाजता जैताई सभागृहात संपन्न होणार आहे.