संजय खाडे सह काँग्रेस पदाधिकारी पक्षातून निलंबित.
लोकवाणी जागर वृत्त
वणी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवीत असताना काँग्रेसचे पदाधिकारी संजय खाडे यांनी अपक्ष उमेदवारी लढवून पक्ष शिस्तीचा भंग केला म्हणून त्यांना पुढील सहा वर्षांकरिता निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांना मदत करत असलेले कॉंग्रेस प्रदेश प्रतिनिधी नरेंद्र पा.ठाकरे, जिल्हा कॉंग्रेस कमिटी सदस्य पुरुषोत्तम आवारी, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद वासेकर, शकर वराटे, प्रशांत गोहोकार, युवा कॉंग्रेस उपाध्यक्ष- पलाश तेजराज बोढे, प्रदेश सरचिटणीस महिला काँग्रेसच्या वंदना आवारी इत्यादी आठ पदाधिकाऱ्यांना तातडीने कॉंग्रेस पक्षातुन निलंबित करण्यात येत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
गुरुवारी सायंकाळी पाच वाजता येथील वसंत जिनिंग हॉल मध्ये पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना (ऊबाठा) व इतर घटक पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवीत आहे. त्यामुळे जागा वाटपानुसार यवतमाळ जिह्यातील ७ जागे पैकी सर्वाधिक ५ जागा काँग्रेस तर एक एक जागेवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस लढवीत आहे.
यातील वणी विधानसभेची जागा ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला गेली व त्यांनी संजय देरकर यांच्या हातात मशाल दिली. शिवसेना गटाला जागा गेल्याने नाराज झालेले काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते संजय खाडे यांनी अपक्ष उमेदवारी लढविण्याचा निर्णय घेतला व ते निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे काँगेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे निर्देशावरून निलंबित करण्यात आल्याचे एका पत्राद्वारे कळविण्यात आले.
विशेष म्हणजे जे काँग्रेस पदाधिकारी खाडे यांचेसोबत आहे त्यांनाही सहा वर्षांसाठी पक्षातुन निलंबित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेतून दिली.
यावेळी कॉंग्रेस नेते वामनराव कासावार, ऍड देविदास काळे, प्रा.टिकाराम कोंगरे, डॉ. महेंद्रसिगं लोढा, आशिष खुलसंगे, घनश्याम पावडे, डॉ मोरेश्वर पावडे, डॉ कावडे, विवेक मांडवकर यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.