महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणा-याला धडा शिकवा – आ. सुधाकर अडबाले

0
121

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणा-याला धडा शिकवा – आ. सुधाकर अडबाले

संपूर्ण काँग्रेस देरकर यांच्या पाठिशी – वामनराव कासावार

वसंत जिनिंग येथे संजय देरकर यांच्या प्रचारार्थ सभा

वणी – महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगक्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे. मात्र महायुती सरकार महाराष्ट्राऐवजी गुजरातला झुकते माप देऊन राज्यातील उद्योग गुजरातला पळवून नेत आहे. त्यामुळे याचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर तर परिणाम होत आहे. याशिवाय राज्यात बेरोजगारी वाढत आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकरी, रोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात सत्ता परिवर्तन होणे गरजेचे आहे. त्यामुळे जनतेने एकजुटीने वणी व महाराष्ट्रात महाविकास आघाडीची वज्रमूठ मजबूत करावी, असे आवाहन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.

गुरुवारी शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ वसंत जिनिंग लॉनमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे, अंबादास वाघदरकर, उत्तम गेडाम, ॲड. देविदास काळे, वसंत जीनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे, किरण देरकर, जयसिंग गोहोकार, साधना गोहोकार, संध्या बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर माजी आमदार वामनराव कासावार हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

संपूर्ण काँग्रेस देरकर यांच्या पाठिशी – वामनराव कासावार

अध्यक्षीय भाषणात वामनराव कासावार यांनी सरकारच्या धोरणांचा सडेतोड समाचार घेतला. हे सरकार शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. आज शेतक-यांच्या मालाला भाव तर नाही उलट सरकार खत, शेतीचे अवजार, कीटकनाशक यावर जीएसटी लावत आहे. मविआची सत्ता आल्यास नागरिकांना कुटंब रक्षण योजनेअंतर्गत 25 लाखांचे विमा कवच मिळणार, लाडक्या बहिणींना 3 हजार मिळणार, शेतक-यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी, जातनिहाय जनगणना, युवकांना 4 हजार रुपये दरमहा मिळणार, या मविआच्या पंचसूत्री कार्यक्रमाचा उल्लेख केला. संपूर्ण काँग्रेस संजय देरकर यांच्या पाठिशी असून यावेळी विजय निश्चित आहे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

या सभेला वणी विधानसभा क्षेत्रातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, जुनी पेन्शन संघटना, समविचारी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात संजय देरकर यांचे समर्थक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here