वणी परिसरात ऑटो वाहतूक सैराट, कालबाह्य झालेले ऑटो वणीच्या रस्त्यांवर….

0
835

वणी परिसरात ऑटो वाहतूक सैराट, कालबाह्य झालेले ऑटो वणीच्या रस्त्यांवर….

बेशिस्त ऑटो चालक रस्त्यांवर ट्रॅफिक जाम कऱण्यात वस्ताद…. रेल्वे फाटकावर खुलेआम दादागिरी. ऑटो ड्रायव्हरला गणवेश व गाडी वर परवाना लावणे बंधनकारक करा.

राजु तुरणकर – संपादक.

वणी शहरातील विस्कळीत झालेली वाहतूकीचे चित्र बदलण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिस प्रशासन करीत आहे. बेजवाबदारपणे दुचाकी, ऑटो गाड्या चालवून रस्त्यावरील वाहतूक विस्कळित करण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उभारून वाहतूक पोलीस हि कारवाई करीत आहे. परंतु हि विस्कळित वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी जागोजागी वाहतूक संदेश देणाऱ्या जाहिराती व ऑटो चालक, शाळकरी बसेस व जड वाहतूक करणाऱ्यांची बैठक लावून प्रबोधन करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहे.

वणी शहर व परीसरात हजारो ऑटो, पिण्याच्या पाणीवाटप करणाऱ्या गाड्या, स्कूल बस कसलीही बंधने न पाळता फिरत असतात. वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांना नियमावली लागू करणे गरजेचे आहे.त्यामुळे या गाड्यांची वाहतूक पोलिसांकडून नियमानुसार चेकिंग करुण त्यावरती अधिकृत असा सिम्बॉल लावून त्या सर्व गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर व ऑटो चालकांना गणवेश सक्तीचा करुण व गळ्यात ओळखपत्र ठेवणे बंधनकारक केल्यास अनधिकृत पणे व मुदतबाह्य चालणारी वाहने रस्त्यावर आपोआपच चालणे बंद होइल व वाहतूकोंडी सुद्धा कमी होइल व वाहतुकीला सिस्त लागेल.

कुठेही ऑटो, पाण्याच्या गाड्या, शाळकरी वाहने उभे केल्यास दंड ठोठावण्याची मोहीम पोलिस प्रशासनाने सूरू केल्यास वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

केवळ दोन मुख्य रस्त्यांवर वणी शहराची वाहतूक व्यवस्था अवलंबून आहे. कोणतेही सिग्नल नाही, एकमेव पार्किंग, बंद केलेली एकेरी वाहतुक, लघू व्यावसायिकांची रस्त्यांवर दादागिरी, बेलगाम ऑटोंची वाहतूक या सर्व प्रकारामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्याने चालणेही कठीण झाले आहे. या प्रकाराकडे पोलिस प्रशासनाने आतापर्यंत दुर्लक्ष केले आहे, रामनवमी उत्सव समितीच्या वतीने निवेदन देताच खडबडून वाहतूक पोलिसांना जाग आली.

परंतु उशिरा का होईना पोलिस प्रशासनही वाहतूक कोंडी सोडण्यासाठी सरसावले आहे. काही कायदे हे धाक दाखवून व्यवस्था निर्माण करण्यासाठी असतात, न की सरळ कायदा उगारून अन्याय्य करण्यासाठी याचि जाणीव माञ वाहतूक पोलिसांना नाही याची खंत वाटते, वरून दबाव असल्याचे सांगत वाहतूक पोलीस प्रशासन लोकांना नियम समजावून न सांगता सरळ दंडाची पावती थोपवून वसुलीचा बडगा उभारून हिच आपली जवाबदारी व कर्तव्य असल्याचे सांगत, वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.

सर्व ऑटो चालकांना आता वाहन चालवण्याचा परवाना सोबत ठेवावा, गणवेशातच ऑटो, तसेच ऑटोचालकाला त्याच्या बाजूला प्रवासी बसवण्यास मनाई करण्यात यावी, तर कुठेही ऑटो उभा केल्यास दंड . यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध खासगी वाहनाद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने द्यावा.

एकीकडे ऑटोचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतानाच दुसरीकडे बेफाम वेग, कर्कश आवाज करून दुचाकी चालवणाऱ्यांवरही कारवाई करावी, प्रशासनाने टोइंग मोहीम सुरू करावी. तरच वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी गती मिळेल. याचसोबत जड वाहनांच्या शहरात प्रवेश मनाईच्या वेळा ठरवून तशी फलके लावून ईतर वेळेत जड वाहन शहराच्या रस्त्यावर आणणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे.

दंडात्मक कारवाई पासून वाचण्यासाठी वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे. तसेच वाहन उभे करण्यासाठीं पिवळ्या पट्ट्या माराव्या, त्याच्या आत आपले वाहन उभे करावे, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेने करावे. अवैध प्रवासी वाहने बसस्थानकावर मोहीम राबवणे गरजेचेआहे . बसस्थानकाच्या परिसरामध्ये होत असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीवर बसस्थानकात प्रवाशांना हायजॅक करणाऱ्या खासगी वाहनधारकांवर कारवाई करण्यात यावी. तसेच ही मोहीम नियमित सुरू रहावी. अशी मागणी लोकवाणी जागर च्या माध्यमातून जनता करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here