प्रगतीनगर लगतच्या मोकळ्या जागेतील प्रभु रामचंद्र यांची प्रतीमा असलेल्या झेंडा काढण्यावरून रोष…

0
1458

प्रगतीनगर लगतच्या मोकळ्या जागेतील प्रभु रामचंद्र यांची प्रतीमा असलेल्या झेंडा काढण्यावरून रोष….
जागा हडप करण्याच्या उद्देशातून तक्रार केल्याचा नागरिकांचा आरोप.

राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

वणी: प्रगतीनगर वणी लगत असलेल्या गणेश सोसायटी येथील मोकळ्या जागेवर लावलेला धार्मिक झेंडा नगर परिषद प्रशासनाने काढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. सदर मोकळी जागा ही धार्मिक कार्यासाठी उपयोगात आणली जावी, या उद्देशाने परिसरातील भाविकांनी या ठिकाणी झेंडा लावला होता. या परिसरात हनुमान जयंती व राम नवमीला धार्मिक कार्यक्रम व्हायचे. मात्र मोकळ्या जागेच्या शेजारी राहणा-या दोन कुटुंबाने प्रशासनाकडे तक्रार केली. त्यामुळे या ठिकाणी लावण्यात आलेला झेंडा काढण्यात आला. विशेष म्हणजे या मोकळ्या जागेवर तक्रारदारांचे अतिक्रमण असल्याचे समोर आले आहे.

वणीतील प्रगती नगर लगत असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये गणेश गृहनिर्माण सोसायटी आहे. या सोसायटीत संजय शेलवडे व विनोद मत्ते यांच्या घराच्या मध्ये सुमारे 2 हजार फूट उपयोगात येत नसलेली जागा रिकामी आहे. सदर जागा ही रस्त्याची खुली जागा आहे. मागील अनेक वर्षांपासून परिसरातील लोक हनुमान जयंती उत्सव साजरा करतात. मागील वर्षी या ठिकाणी परिसरातील भाविकांनी प्रभु श्रीराम यांचे चित्र असलेला धार्मिक झेंडा या ठिकाणी लावला.

या मोकळ्या जागेच्या दोन्ही बाजूला राहत असलेले शेलवडे व मत्ते यांनी याची तक्रार नगर पालिकेकडे केली. तक्रारीची दखल घेत नगर पालिकेने पोलीस पथकाला सोबत घेत या ठिकाणावरचा झेंडा काढला. लवकरच राम नवमी व हनुमान जयंती आहे. त्याआधीच हा झेंडा काढल्याने परिसरातील भाविकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

तक्रार करणा-यांचेच 500 फुटांचे अतिक्रमण आहे, सदर मोकळी जागा ही रोडची आहे. या सुमारे 2 हजार स्क्वेअर फुटाच्या जागेपैकी सुमारे 500 फुटापेक्षा जास्त जागेवर तक्रारदारांनीच अतिक्रमण केले आहे. नगर पालिकेच्या कर्माच-यांनी जागेची मोजणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. हळू हळू या जागेवर अतिक्रमण करून जागा हडप करण्याचा तक्रारदारांचा उद्देश आहे. असा संशय व्यक्त करीत यातूनच दोन्ही कुटुंब सातत्याने तक्रार करीत असल्याचा आरोप सोसायटीतील रहिवासी करीत आहे.

प्रशासनाने या ठिकाणावर असलेले दोन्ही कुटुंबानी केलेले अतिक्रमण त्वरीत काढावे व सदर जागा मोकळी करावी. या ठिकाणी मुरुम टाकून येथे रस्ता तयार करावा, अशी मागणी सोसायटीतील नागरिक करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here