देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाचेच घर फोडले
पोलिसांना चोरट्यांचे आवाहन, शहरातील सामान्य जनता असुरक्षित. कोण करत शहरातील बंद घरांची रेकी… घराला कुलूप चोरी पक्की…. वणी पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह…
राजु तुरणकर – लोकवाणी जागर वणी शहर व परिसरात सातत्याने चोरट्यांचा हैदोस सुरू आहे. एकामागून एक घरफोडी , चोऱ्या सुरू आहेत.
देशाची रक्षा करणाऱ्या सैनिक रवींद्र बरडे यांच्या घरी घरफोडी झाल्याने आता शहरात सुरक्षित कोण, असा प्रश्न उपस्थित झाला असुन या घटनेचा तपास करून चोरट्यांना पकडणे वणी पोलिसांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
चोरीची घटना काल सोमवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी बंद घराच्या समोरील दाराची कडी तोडून आत प्रवेश केला. कपाटातून तब्बल पाच तोळयाचे सोन्याचे दागिने लंपास केले. यावेळी चोरट्यांनी आजूबाजूचे तसेच घराच्या वरच्या माळ्यावर राहणाऱ्या भाडेकरूंच्या घराला बाहेरुन कडी लावली. रवींद्र बरडे यांची पत्नी सोनू बरडे हिने याबाबत वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. रवींद्र बरडे हे लष्करी सेवेत असून सध्या ते अरुणाचल प्रदेश येथे कर्तव्यावर आहेत. लक्ष्मीनगर येथे त्यांचे घर असून त्यांच्या पत्नी सोनू बरडे व मुले येथे राहतात. तर त्यांचे आईवडील निंबाळा येथे राहतात. रविवारी (ता. २७) भांदेवाडा येथे बरडे कुटुंबीयांचा
स्वयंपाक असल्याने सोनू बरडे भांदेवाडा येथे गेल्या होत्या. रात्री उशीर झाल्यामुळे त्या निंबाळा येथेच घरी थांबल्या. सकाळी त्यांच्या घरात वरच्या माळ्यावर राहणाऱ्या भाडेकरूंचा फोन आला की, आमच्या घराचे दार बाहेरून कुणीतरी लावले आहे. तेव्हा सोनूने समोरील घर मालकांना फोन करून भाडेकरूचे दार उघडायला सांगितले. तेव्हा ही घटना उघडकीस आली. शेजारील एका घराच्या सीसीटीव्हीने तीन चोरट्यांची हालचाल टिपली आहे. चोरट्यांनी घरातील पलंग, फ्रीज, किचनच्या आलमारी तसेच बेडरुममधील कपाटातील सर्व साहित्य व कपड्यांची अस्ताव्यस्त फेकफाक केली. तसेच लाकडी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याची दोन गोफ, एक पोत, दोन अंगठ्या व कानातली एक जोडी, असे अंदाजे पाच तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार गोपाल उंबरकर हे ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. ठसे तज्ज्ञ व श्वान पथकालाही बोलावण्यात आले होते.
वणी शहरातील बंद घरांची रेकी दिवसभर कुणीतरी करतं अशी आता शंका निर्माण होत आहे. घराला कुलूप ते घर त्या रात्रीच फोडल्या जाते. बंद घर चोरी पक्की , त्यामुळे वणी पोलिसांनी दिवसभर फिरणाऱ्या लोकांवरती नजर ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करून शोध घेणे गरजेचे असल्याचे जनमानसात चर्चा सुरू आहे.