वणी एस टी आगारासाठी ५ नवीन एस.टी. बसेस मंजूर.

0
296

ग्रामीण जनतेला दिलासा: आमदार संजय देरकर यांच्या प्रयत्नांना यश — वणी एस टी आगारासाठी ५ नवीन एस.टी. बसेस मंजूर.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार संजय देरकर यांनी मांडली होती भूमिका.

राजु तुरणकर – वणी .

वणी: वणी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. आमदार संजय देरकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वणी एस.टी. आगारासाठी बसगाड्यांची मागणी अत्यंत ठामपणे मांडली होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि जोरदार पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने ५ नवीन एस.टी. बसेस मंजूर केल्या आहेत. ही मंजुरी वणी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारी आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात अनेक गावांमधून रोज शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहनाअभावी शिक्षणात अडथळे येत होते. प्रवासात होणारा वेळेचा अपव्यय, अपुरी व अनियमित बससेवा यामुळे त्यांच्या भविष्यावर परिणाम होत होता. तसेच, बाजारपेठांमध्ये ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना देखील प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता संजय देरकर यांनी हा विषय केवळ विधानसभेत उपस्थित केला नाही, तर प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत राहिले.

या प्रयत्नांना यश मिळत ५ एस.टी. बसेस वणी आगारासाठी मंजूर झाल्या असून, त्या लवकरच प्रत्यक्ष सेवेकरिता उपलब्ध होतील. या बसेस ग्रामीण भागाला शहरांशी अधिक मजबूतपणे जोडतील आणि शिक्षण, आरोग्य व व्यापारासाठी नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित व वेळेवर होईल.

ही मंजुरी म्हणजे वणी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी झटणाऱ्या लोकप्रतिनिधीची कार्यक्षमता व दूरदृष्टी यांचे ठोस उदाहरण आहे. या निर्णयामुळे मतदारसंघातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण असून, संजय देरकर यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले जात आहेत.

“जनतेच्या अडचणींवर ठाम भूमिका घेणारा आमदार म्हणून संजय देरकर हे नाव आता अधिक बळकटपणे लोकांच्या मनात अधोरेखित झाले आहे,” असे स्पष्ट मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here