उद्या वेळाबाई फाटा येथे जडवाहतूक बंद आंदोलन.
काम सूरू होईपर्यंत जड वाहतुकीला बंदी, शिवसेना बांधकाम विभागा विरोधात आक्रमक.
राजु तुरणकर – संपादक
वणी तालुक्यातील वेळाबाई फाटा ते वेळाबाई ग्राम रस्त्याच्या बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या आहेत मात्र अद्याप वर्कऑर्डर देण्यात आली नाही. मागील पाच वर्षांपासून स्थानिकांना होणाऱ्या यातना, पिकांची नष्ठ झालेली उत्पादन क्षमता लक्षात न घेता संबंधित विभाग चाल ढकलपणा करताना दिसत आहे.
परिसरात मोहदा येथे मोठ्या प्रमाणात असलेल्या गौण खनिजांच्या खाणी, त्यातून उत्खनन व निर्माण होत असलेल्या खनिजाचे हजारों अवजड वाहनातून इतरत्र होणारे दळणवळण, यामुळे अक्षरशः रस्त्याची चाळणी झाली आहे. स्थानिकांच्या घरावर दोन इंच धुलिकणांचा थर साचला आहे, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतातील पिकांची पुर्णतः वाट लागली आहे. तर उत्पादन क्षमता संपुष्टात आली आहे.
वेळाबाई फाटा ते वैळाबाई या दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरुन दररोज हजारों अवजड वाहने खनिजांची वाहतूक करतात. वाहनांच्या दळणवळणामुळे प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. परिसरातील नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. वातावरणात ‘सिलिकाइस्ट” पसरतोय यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढला आहे. तर प्रदूषणामुळे वंध्यत्व, नपुसकत्व येण्याची भीती निर्माण झाली आहे.
वेळाबाई फाटा ते वेळाबाई गाव या रस्त्याच्या तांत्रिक बाबी पूर्ण होवून सुद्धा काम सुरु न केल्याने उद्या 6 मे पासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आ. संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात संजय निखाडे शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांना सोबत घेऊन या मार्गावरील मालवाहतूक रस्ता बांधकामाला सुरवाल होई पर्यंत बंद ठेवण्यात येईल. या तीव्र आंदोलनात काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.