वणी तालुक्यात वाळू वाटपाचे धोरण निश्चित — मंडळ निहाय क्षेत्रातून वाळूचा होणार वाटप.

0
278

वणी तालुक्यात वाळू वाटपाचे धोरण निश्चित — मंडळ निहाय क्षेत्रातून वाळूचा होणार वाटप.

आ. संजय देरकर, SDM हिंगोले, तहसीलदार धूळधर यांच्यातील चर्चा यशस्वी.

राजु तुरणकर – संपादक.

वणी : तालुक्यातील रखडलेली घरकुल कामे मार्गी लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आज ता. १४ रोजी दुपारी २ वाजता तहसील कार्यालयातील तहसीलदार कक्षात आमदार संजय देरकर यांनी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले व तहसीलदार निखिल धुळधर यांच्यासोबत वाळू वाटपाच्या धोरणावर सविस्तर चर्चा केली. यावेळी दिलीप भोयर, भगवान मोहिते, सुधीर थेरे, अजय कवरासे, डॉ. जगन जूनगरी आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत वणी तालुक्यातील वणी, शिंदोला, शिरपूर, कायर, रासा, राजूर, पुरवट, भालर या आठ मंडळांतील घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या वाळू वाटप प्रक्रियेमध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या समन्वयातून वाहनांमध्ये GPS प्रणाली बसवून पारदर्शकतेने वाळूचे वितरण होणार आहे.

पंचायत समिती वणीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी सर्व लाभार्थ्यांची यादी तहसील प्रशासनाकडे सुपूर्द केली असून, लाभार्थ्यांच्या गरजेनुसार संबंधित ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे वाळूची मागणी करायची आहे.

पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी ज्या वाळू घाटांचा समावेश करता येणार नाही, अशा घाटांना वगळून उर्वरित पात्र घाटांमधून प्रत्येक लाभार्थ्याला ५ ब्रास वाळू दिली जाणार आहे. वणी तालुक्यात सुमारे १० हजारांहून अधिक घरकुल लाभार्थी असून, वाळू अभावामुळे रखडलेली कामे आता वेग घेणार आहेत.

आमदार संजय देरकर यांच्या पुढाकारामुळे वाळूच्या गंभीर प्रश्नावर मार्ग निघाल्याने तालुक्यात सर्वत्र समाधानाचे वातावरण असून, नागरिकांकडून आमदार देरकर यांचे आभार मानले जात आहेत.

मारेगाव व झरी जामणी येथे हीच पद्धत…..
वणी प्रमाणेच मारेगाव व झरी जामणी तालुक्यातील घरकुल धारकांच्या समस्या आहे. त्यांना देखील लागणारी वाळू वणी तालुक्यातील धोरणाप्रमाणे मिळणार आहे. तरी सर्व लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतील सरपंच व ग्रामसेवकाच्या माध्यमातून वाळूची मागणी करावी असे आवाहन आमदार संजय देरकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here