प्रत्येक हाताला काम , प्रत्येक शेताला पाणी हा पं. दीनदयालजींचा नारा होता- गजानन कासावार यांचे प्रतिपादन.
मारेगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी.
मारेगाव : जनसंघाच्या 1965 मध्ये विजयवाडा अधिवेशनात एकात्म मानव दर्शन हा विचार “सिध्दांत आणि नीती” म्हणून स्विकारल्या गेला. दिनांक 22 ते 25 एप्रिल 1965 रोजी मुंबई येथे पं. दीनदयालजी यांचे चार व्याख्याने झाली ती व्याख्याने म्हणजेच ‘एकात्म मानव दर्शन’ होय. त्यात त्यांनी भारताला पुन्हा विश्वगुरु बनविण्यासाठी हा विचार मांडून प्रत्येक हाताला काम, प्रत्येक शेतीला पाणी हा नारा दिला होता. असे प्रतिपादन अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार यांनी केले. ते मारेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव येथील सहयोगी प्राचार्य राजेश ढबाले हे होते. मुख्य वक्ते म्हणून अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विस्तारक वैभव वाघमारे , शिल्प निदेशिका सुनिता उईके, शिल्प निदेशिक चंद्रशेखर वासनिक हे उपस्थित होते.
एकात्म मानव दर्शन हा विषय मांडताना कासावार म्हणाले की, माणसाच्या सुखाचा विचार केला असता शरीर, मन, बुध्दी आणि आत्मा यांच्यातील समन्वयाचा विचार एकात्म मानव दर्शन मध्ये सांगीतला आहे. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांचा विचार करता, धर्माचे पालन करीत कमविलेल्या धनाच्या (अर्थाच्या) आधारे संतुलित भोगविलास भोगून मोक्ष प्राप्ती मिळवणे होय. अशा प्रकारे चारही पुरूषार्थ हे एकात्म आहेत. चतुर्विध पुरूषार्थ संपन्नतेने व्यक्ती जीवन हे समृध्द आणि गतिमान ठेवणे हे भारतीय चिंतनाचे वैशिष्ट आहे. शरीर, मन, बुध्दी आणि आत्मा यांचे उपभोगाबरोबर संयम आणि समर्पण यांच्या अधिकाराबरोबर कर्तव्याचे व्यक्तीबरोबर समष्टी, सृष्टी आणि परमेष्टीचे अखंड अवधान ठेवून चालणारे एकात्म सुख म्हणजे एकात्म मानव दर्शन होय.
अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्राचार्य राजेश ढबाले यांनी पं. दीनदयाल यांच्या विचारांचे महत्व सांगून प्रत्येक युवकांनी आपल्या जीवनात याचे अनुकरण करावे असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्प निदेशिका रीना पेंढारकर व आभार प्रदर्शन शिल्प निदेशक मोहन पायघण यांनी केले.