आमदार-खासदार नव्हे, शिवभक्ती हवी” — राजू उंबरकरांचा एल्गार; वणीत भव्य शिवजयंती उत्सवाने शहर दणाणले…
वणीकरांच्या मनातील स्वप्नाला आवाज; छत्रपतींच्या भव्य पुतळ्यासाठी राजू उंबरकरांचा संकल्प.
राजू तुरणकर – संपादक.
वणी शहरात शिवजयंती महोत्सवानिमित्त मनसे नेते राजू उंबरकर यांनी तिथीनुसार सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा साजरा करत शिवप्रेमींसाठी शिवकालीन किल्ल्याचा दिमाखदार देखावा उभा केला. या देखाव्यामुळे उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वराज्याच्या वैभवाची आणि ऐतिहासिक राज्यकारभाराची जिवंत अनुभूती मिळाली.
हा उत्सव केवळ कार्यक्रम नव्हता तर शिवभक्तीचा जाज्वल्य आविष्कार होता. या उपक्रमामुळे वणीकर जनतेने मनसे नेते राजू उंबरकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी वणीकर जनतेच्या मनातील वेदना मांडत वणी शहराला शोभेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि भव्यदिव्य पुतळा उभारण्याचा निर्धार राजू उंबरकर यांनी जनतेसमोर जाहीर केला. या घोषणेने उपस्थित जनसमुदायात प्रचंड उत्साह निर्माण झाला.
यावेळी बोलताना त्यांनी ठाम शब्दात सांगितले की,
“छत्रपतींचे कार्य करण्यासाठी आमदार किंवा खासदार होण्याची गरज नसते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेली भक्ती, निष्ठा आणि स्वराज्याचा जाज्वल्य अभिमान असला की सामान्य माणूसही इतिहास घडवू शकतो. फक्त जनतेची साथ आणि आशीर्वाद मिळाला तर वणीमध्ये छत्रपतींच्या वैभवाला साजेसा पुतळा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही.”
ढोल-ताशांच्या कडकडाटात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. असा भव्य, दिमाखदार आणि शिवमय शिवजयंती उत्सव पाहून वणीकर जनता अक्षरशः भारावून गेली.
दरम्यान, मनसे नेते राजू उंबरकर व फाल्गुन गोहोकर यांनी शिवकालीन देखावा उभारण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे विराज चिकनकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा विशेष सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
“जिथे शिवभक्ती असते तिथेच स्वराज्याची ज्योत प्रज्वलित होते,” हेच या भव्य उत्सवातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.












