अजिंक्य शेंडे यांचा युवासेना उपजिल्हा प्रमुख (वणी विधानसभा) पदाचा राजीनामा
निष्ठावंत शिवसैनिकांना दुय्यम वागणूक — अन्यायाविरुद्ध ठाम बंड.
राजू तुरणकर – संपादक.
छञपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांच्या प्रेरणेने कट्टर शिवसैनिक म्हणून अनेक वर्षे युवासेनेच्या माध्यमातून प्रामाणिक, निस्वार्थी आणि झोकून देऊन काम करणारे अजिंक्य शेंडे यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा जाहीर केला आहे.
सत्ता, पद किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे; तर हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि जनसेवेच्या ध्यासातून त्यांनी काम केले. विद्यमान आमदार यांच्या निवडणुकीत युवकांची भक्कम फौज उभी करून संपूर्ण मतदारसंघात संघटनात्मक ताकद दाखवून दिली. त्यांच्या या राजीनाम्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पक्षाने केला सन्मान… पण स्थानिक पातळीवर उपेक्षा
वणी शहरात युवक-विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधत भव्य प्रवेश मोहीम राबविणे, गरजू नागरिकांना रेशनकार्ड व शासकीय कागदपत्रांसाठी मदत करणे, कोविड काळात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून जीव वाचविणे, शहरात औषध फवारणी, बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त मॅरेथॉन, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो छत्री वाटप, २६ जानेवारी रोजी बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूविरोधात धरणे आंदोलन, तसेच शिवजयंती व श्री संत गाडगे बाबांच्या जयंतीनिमित्त रायगड किल्ला येथे स्वच्छता मोहीम — अशा असंख्य समाजोपयोगी उपक्रम राबवून मतदासंघात अजिंक्य शेंडे यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.
कार्याची दखल घेऊन पक्षाने सामना या मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रातून चार वेळा उपजिल्हा प्रमुख या पदावर निवड करून सन्मान पक्षाकडून मिळाला, मात्र स्थानिक नेतृत्वाकडून सातत्याने दुय्यम वागणूक मिळाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
“मीच म्हणजे पक्ष” — एकाधिकारशाही मानसिकतेचा आरोप
गेल्या काही काळात महत्त्वाच्या बैठका, निर्णयप्रक्रिया आणि नगरपरिषद सीट वाटप चर्चेत जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संघटनेत “मीच म्हणजे पक्ष” अशी एकाधिकारशाही मानसिकता वाढली असून निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
वणी शहरातील युवासेना शहर प्रमुख पद दीर्घकाळ रिक्त आहे. झरी–मारेगाव व मारेगाव तालुक्यातील संघटनात्मक कार्य ठप्प आहे. वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. उलट, निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उपेक्षित ठेवण्यात आले.
शिफारसपत्र नाकारल्याचा गंभीर आरोप.
जिल्हा प्रमुख पदासाठी अजिंक्य शेंडे यांचा कार्य अहवाल मुंबईत गेल्यानंतरही, वारंवार विनंती करूनही आमदारांकडून शिफारस पत्र न देण्यात आल्याचा गंभीर आरोप राजीनामा पत्रातून करण्यात आला आहे. पक्षासाठी रक्ताचे पाणी करूनही निष्ठेची अशी उपेक्षा होणे ही वेदनादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
स्वाभिमान जपत ठाम निर्णय.
या सर्व प्रकाराचा निषेध म्हणून आणि स्वाभिमान जपत अजिंक्य शेंडे यांनी युवासेना उपजिल्हा प्रमुख (वणी विधानसभा) या पदाचा तत्काळ राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे.












