उष्माघात झालेल्या अजगरावर वणी येथे यशस्वी उपचार.
वन्य प्राण्यांची सुद्धा उन्हामुळे बेहाल…
राजु तुरानकर वणी : वाढत्या तापमानाचा फटका आता वन्यजीवांनाही बसत असून, आज दि. 27/05/2026 रोजी तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, वणी येथे उष्माघात (Heat Stress) झालेल्या अजगरावर यशस्वी उपचार करण्यात आले.
सदर अजगरामध्ये शरीराचे तापमान वाढणे (Increased Body Temperature), हालचालींमध्ये मंदपणा तसेच तोंड उघडे ठेवून श्वास घेणे अशी गंभीर लक्षणे आढळून आली. परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेरणा कनले व पशुधन पर्यवेक्षक श्री. अखिल गुंजेवार यांनी तत्काळ प्राथमिक उपचार सुरू केले.

उपचारामध्ये फ्लुईड थेरपी (Fluid Therapy) व आवश्यक औषधोपचार करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे अजगराची प्रकृती स्थिर झाली असून त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाकडून देण्यात आली.

उपचारानंतर संबंधित अजगरास पुढील निरीक्षणासाठी वनविभाग, मारेगाव यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेमुळे वन्यजीवांनाही त्रास होत असल्याने नागरिकांनी अशा प्राण्यांना इजा न करता तात्काळ वनविभाग किंवा पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












