वणी पोलिसांची धमाकेदार कारवाई; शहरातून मटका कायमचा बंद होणार ?
अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले, पोलीस आता मटका जुगार अड्ड्यांवर चालवणार बुलडोझर ?
राजु तुरानकर वणी : शहरातील दीपक चौपाटी परिसरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध वरली मटका जुगारावर अखेर वणी पोलिसांनी धाड टाकत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शहरातील मटका व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून “आता मटका कायमचा बंद होणार का?” अशी चर्चा सुरू झाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोहेकॉ. अविनाश वामनराव चिकराम यांच्या फिर्यादीवरून आरोपी अब्दुल शब्बीर अब्दुल रहेमान (वय 57, रा. मोमिनपुरा, वणी) आणि अशीद खान अजहर उल्ला खान (वय 37, रा. गुरुनगर, वणी) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) तसेच बीएनएस कलम 49 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 18 मे 2026 रोजी दुपारी साडेदोन वाजताच्या सुमारास दीपक चौपाटी नगर, नगरपरिषद कॉम्प्लेक्सजवळ सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी अब्दुल शब्बीर हा नागरिकांकडून पैसे घेऊन वरली मटक्याचे आकडे लिहिताना पोलिसांना रंगेहाथ आढळून आला.
पंचासमक्ष करण्यात आलेल्या कारवाईत मटका आकडे लिहिलेले पट्टी बुक, कार्बन तुकडा, पेन तसेच 2 हजार रुपयांची प्रचंड मोठी रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चौकशीदरम्यान आरोपी अब्दुल शब्बीर याने सदर मटका व्यवसायाचा मुख्य मालक अशीद खान असल्याचे सांगितले असून आपण रोजंदारीवर काम करत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे आता वणी शहरातील मटका जुगार खेळणे आणि चालवणे कठीण आहे असे म्हणत मटका धंदे वाले फरार झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

दरम्यान, या कारवाईनंतर शहरातील इतर मटका अड्ड्यांवरही पोलिसांचा बुलडोझर फिरणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका. मारोती पाटील करीत आहेत.












