वणी तालुक्यातील कायर गावचे सुपुत्र प्रशांत (बुद्धीवान) बिंबिसार निखाडे यांची पोलीस उपअधीक्षक (DySP/ACP – Class 1) पदी निवड.
शिवसेनाच्या वतीने कायर येथे घरी जावून केला सन्मान.
राजू तुरणकर – वणी.
वणी तालुक्यातील कायर या गावातील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र प्रशांत (बुद्धीवान) बिंबिसार निखाडे यांनी सलग पाच वर्षांत आठ उच्चपदस्थ शासकीय पदांवर यश मिळवत इतिहास रचला असून 2025 मध्ये त्यांची पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police) / सहायक पोलीस आयुक्त (ACP – Class 1) पदी निवड झाली आहे. या उतुंग भरारी घेणाऱ्या प्रशांतच्या घरी जावून शिंदे सेनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
प्रशांत निखाडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कायर येथे, माध्यमिक शिक्षण विवेकानंद विद्यालय कायर येथे झाले. त्यांनी एसपीएम कॉलेज, वणी येथून अकरावी-बारावी विज्ञान शाखेत विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथे बी.एस्सी. पदवी पूर्ण केली.
2018 मध्ये पुणे येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. कोरोना महामारीच्या काळात गावी परत येऊनही त्यांनी अभ्यासात खंड पडू दिला नाही.
2020 व 2021 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त परीक्षेत PSI (पोलीस उपनिरीक्षक), STI (राज्य कर निरीक्षक) व ASO (सहाय्यक कक्ष अधिकारी) अशा पदांवर दुहेरी यश मिळवत सलग सहा पदांवर गवसणी घातली.
2023 मध्ये राज्यसेवेतून सहाय्यक गटविकास अधिकारी (Assistant BDO) म्हणून नियुक्ती झाली.
आणि आता 2025 मध्ये पोलीस उपअधीक्षक (DySP/ACP – Class 1) पद मिळवून त्यांनी यशाचा शिखर गाठला आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कायर गावासह संपूर्ण वणी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीनंतरही त्यांच्या यशाचा जल्लोष सुरू आहे.
प्रशांत निखाडे यांनी आपले यश महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अर्पण केले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास व योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर मोठी स्वप्ने पाहावीत, असा संदेश दिला आहे.
त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे वणी तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावर झळकले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी शिवसेना (शिंदे) गटाचे जिल्हा संघटक विजय चोरडिया, आशिष खुलसंगे , सुधाकर गोरे, किशोर नांदेकर, प्रसाद ठाकरे, राजू तुराणकर, शुभम गोरे, अजिंक्य शेंडे, प्रतिक गौरकार, विठ्ठल शांकावर, भारत अदे, दत्तू चौधरी, संजय तोमस्कर, नंदु अंबोरे, बंडु कोंग्रे, सागर अडकीले सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.











