वणी वैभवात भर… निलिमाताई काळे प्रतिष्ठित ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ पुरस्काराने सन्मानित.
महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते सन्मान.
महिलांच्या हक्कांसाठी लढणारी ‘रणरागिणी’ ठरली राज्याची मानकरी !
वणी :- राजु तुरणकर
वणी तालुक्याच्या वैभवात मानाचा तुरा खोचणारी अभिमानास्पद कामगिरी करत सौ. निलिमाताई वसंतराव काळे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ जाहीर होऊन भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
महिला सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या निलिमाताई काळे यांच्या कार्याचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे आयोजित या दिमाखदार सोहळ्यात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. छगन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
महिला व बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार सन २०२३-२४ साठी प्रदान करण्यात आला आहे. निलिमाताई काळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून तळागाळातील महिलांच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम घेतले आहेत. महिलांचे शिक्षण, सक्षमीकरण, सामाजिक जागृती, तसेच स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंध यांसारख्या अत्यंत संवेदनशील विषयांवर त्यांनी सातत्याने काम करत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे.
त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावाची दखल घेत महाराष्ट्र शासनाकडून त्यांना १ लाख रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्यांच्या कार्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केले आहे.
निलिमाताई काळे यांचा हा सन्मान संपूर्ण वणी तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरत असून, त्यांच्या कार्यातून असंख्य महिलांना प्रेरणा मिळत आहे. तळागाळातून उभ्या राहिलेल्या या सेवाभावी व्यक्तिमत्त्वाने आज राज्याच्या सर्वोच्च मंचावर झळकून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.












