वणीच्या वैभवात भर टाकणारा ‘रुद्राक्ष वन’ प्रकल्प रखडला !
उद्घाटनाच्या प्रतीक्षेत सांस्कृतिक भवन; विकास फक्त फलकांवरच ?
राजु तुरणकर – वणी.
वणी शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा आणि पर्यावरणपूरक दृष्टीकोनातून उभारण्यात येणारा 17करोड रुपयांच्या ‘रुद्राक्ष वन’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज अक्षरशः करोडो रुपये खर्च करून भंगार अवस्थेत पडून आहे. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठ्या गाजावाज्यात सुरू केलेला हा प्रकल्प आज प्रशासनाच्या उदासीनतेमुळे राडखडल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
प्रकल्पाच्या नावाखाली केवळ दोन संडास-बाथरूम उभारून काम पूर्ण झाल्याचा आभास निर्माण करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र कामचुकार व बेजबाबदार अधिकारी, चुकीचे नियोजन आणि योजनेतील निष्काळजीपणा यामुळे लावलेली झाडे वाळून गेली आहेत, तर परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे प्रकल्पाची मूळ संकल्पनाच धुळीस मिळाल्याचे वास्तव समोर आले आहे.
दरम्यान, वणी शहरात विकासाच्या नावाने सुरू असलेल्या इतर प्रकल्पांची स्थितीही चिंताजनक आहे. गेल्या २५ वर्षांपासून भंगार अवस्थेत पडलेले कल्याण मंडपम, तसेच दोन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले सांस्कृतिक भवन ही प्रशासनाच्या निष्क्रियतेची जिवंत उदाहरणे ठरत आहेत. आता सवाल उपस्थित होतो—या सांस्कृतिक भवनाचीही अवस्था कल्याण मंडपमसारखीच होणार काय अशी चर्चा आता वणीकर जनता करु लागली आहे.
शैक्षणिक, औद्योगिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात आधीच मागे पडलेल्या वणी विधानसभा क्षेत्रात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. प्रदूषण, बेरोजगारी आणि रखडलेले प्रकल्प यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, ठोस निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाची गरज निर्माण झाली आहे.याहूनही गंभीर बाब म्हणजे काही अधिकारी राजकीय साटेलोट्यांमुळे मुजोर बनले असून, त्याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे.
मोठा प्रश्न- वणीचा विकास खरंच होणार का ? की तो फक्त प्रसिद्धीच्या झोतात, घोषणा, भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या फलकांपुरताच मर्यादित राहणार?










