मानवी मुल्ये समाजात रुजविण्यात शाहीरांचे योगदान महत्वाचे – ज्ञानेश महाराव.
वणीत दोन दिवसीय व्याख्यानमाला संपन्न.
राजू तूरणकर — वणी
वर्तमान काळात मानवी मुल्ये पायदळी तुडविण्याचे जाणीवपुर्वक प्रयत्न अतिरेकी धार्मिक संस्था आणि विशीष्ट विचारांचे राजकीय लोक करित आहे. हा समाज,देश आणि जगासमोर मोठा धोका आहे.हा धोका आपल्याला ओळखून पुढील वाटचाल करायची आहे.मानवी जीवन जगतांना स्वातंत्र्य, स्वाभीमान आणि लोकशाही ह्या मुल्यांची उपयुत्तता कायम असते.म्हणुनच ही शाश्वत मुल्ये रुजविण्याकरिता तत्कालीन भारतीय शाहीरांचे कायम प्राधान्य आणि योगदान राहीले.असे प्रतिपादन प्रथितयश पत्रकार, संपादक, रंगकर्मी आणि विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी केले.
शिव महोत्सव समिती च्या पुढाकाराने दि.२८ ऑक्टोबरला बाजोरिया लॉन येथे संपन्न झालेल्या बळीराजा व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ” शाहीरांची लोकशाही “ या विषयावर भाष्य करतांना त्यांनी सदर व्यक्तव्य केले.स्मृतीशेष रामचंद्र जागोजी सपाट यांचे स्मृतीस समर्पित या व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समिती चे अध्यक्ष शहाबुद्धीन अजाणी विराजमान होते.तर विचारपिठावर प्रमुख मान्यवर म्हणुन पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रतिक कावडे आणि डॉ.आंबेडकर वाचनालय मारेगांव चे अध्यक्ष बाबाराव ढवस ईत्यादी उपस्थित होते.
” शाहीरांची लोकशाही ” हा व्याख्यानाचा विषय मांडतांना त्यांनी प्रत्यक्ष स्थानिक कलाकारांच्या साथीने काही शाहीरी प्रत्यक्ष स्वत: गाऊन सादर केल्या.ह्यात शाहीर साबळे, शाहीर आत्माराम पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शाहीरींचा समावेश होता.१८५७ च्या संग्रामात शाहीर अजिमुल्ला खान यांनी ” हम इसके मालीक,हिंदुस्थान हमारा,पाक वतन है कोम का,जश्न से भी प्यारा.तोडो गुलामी की जंजीरे,बरसा है अंगारा,हिंदु मुसलमान सिख ईसाई,भाई-भाई प्यारा हमारा “.अशा शब्दांतून व्यक्त होत स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षतेची मुल्ये देशाला दिली.महात्मा फुले यांनी पोवाडयातुन पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र समाजासमोर आणले.त्यामुळे पुढील काळात शाहीरांनी हीच परंपरा जोपासत वर्तमान परिस्थितीवर कठोर प्रहार करत लोकांचे प्रबोधन केले.आपल्या प्रतिभेने साहित्याच्या माध्यमातून जगात पोहोचलेले अण्णाभाऊ साठे यांनी शाहीरीतून प्रथमत : कष्टकरी माणसांचे आयुष्य केंद्रस्थानी आणले.या प्रसंगी महाराव यांनी “आदी गणाला रणी आणीला,नाही तर रंग पुन्हा सुना सुना ” तसेच ” जग बदल घालुनी घाव,सांगुनी गेले मला भिमराव ” ह्या पंक्ती प्रत्यक्ष त्याच आवेगाने आणि भावनेने गाऊन दाखविल्या.शाहीरी असो वा संतांचे किर्तन असो,ही त्या काळातील समाजाच्या प्रबोधनाची शस्त्रे व साधने होती.ह्या माध्यमांचे महत्व आपण ओळखले पाहीजे.कारण वर्तमान काळ हा अंधाराकडे वाटचाल करत आहे.आपण ह्या विरोधात उभे राहीलो तरच प्रकाश निर्माण होऊन समाज उजळून निघेल,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचा प्रारंभ बळीराजाच्या अभिवादनाने झाला.सामुहिक जिजाऊ वंदना नामदेव ससाणे,अमोल बावने, संजय गोडे, सोनाली थेटे यांनी सादर केली. सुत्रसंचालन समितीचे सदस्य रघुनाथ कांडरकर, प्रास्ताविक भुमिका अनंत मांडवकर तर उपस्थितांचे आभार विनोद किडीले यांनी मानले.मान्यवरांचे स्वागत डॉ.रमेश सपाट,आयोजन समितीचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.करमसिंग राजपुत तसेच समिती सदस्य मंगेश पाखमोडे,शाहिद खान,विलास मेश्राम,संदीप बोंडे.रविंद्र आंबटकर,चंद्रकांत गोहोकार आदींनी ग्रंथ आणि स्मृतीचिन्ह प्रदान करून केले.व्याख्यानमालेचा समारोप राष्ट्रगीताने झाला.वणीकरांच्या चांगल्या उपस्थितीत संपन्न् झालेल्या या दोन दिवसीय व्याख्यानमालेकरिता प्रामुख्याने प्रा.डॉ.करमसिंग राजपुत, सुरेंद्र घागे, वसंत थेटे, कृष्णदेव विधाते, विलास शेरकी, राजेंद्र देवडे, दत्ता डोहे, प्रा.अनिल टोंगे, मारोती जिवतोडे, अशोक चौधरी, शंकर पुनवटकर, विजय दोडके यांनी व शिव महोत्सव समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.