सामाजिक भान असणाऱ्या तरुणांचा, डोळस प्रयोग.

0
130

स्माईल फाउंडेशन करेल २ ज्येष्ठ रुग्णांच्या डोळ्यांचे मोफत ऑपरेशन.
डॉ. अनिकेत अलोणे यांच्या रुग्णालयात योजनेला आरंभ.

लोकवाणी जागर.

वणीः सामाजिक भान जोपासत स्माईल फाउंडेशन ही संस्था आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत मागील अनेक वर्षापासून उत्तम कार्यरत असते. याचाच एक भाग म्हणून स्माईलने ‘नवी दृष्टी’ हा डोळस उपक्रम सुरू केला. या अंतर्गत ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिकेत अलोणे हे दर महिन्याला दोन रुग्णांच्या डोळ्यांचे मोफत ऑपरेशन करतील. या उपक्रमाचा आरंभ नुकताच झाला. यावेळी रेखा तोडकर रंगारीपुरा आणि मीराबाई खिरतकर चिखलगाव यांच्या डोळ्यांचे मोफत ऑपरेशन झाले. या ऑपरेशनमुळे या रुग्णांचे दृष्टिदोष नाहिसे झालेत. ते आता नीट बघू शकतात. डॉ. अलोणे हे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह हे ऑपरेशन करतात. रुग्णांना आवश्यक तो वैद्यकीय सल्ला देतात. रुग्णांनी घ्यावयाची डोळ्यांची काळजी यावर मोफत मार्गदर्शन करतात. या उपक्रमाचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.

वाढत्या वयानुसार दुर्ष्टि कमजोर होते. त्यात अनेक दोष निर्माण होतात. म्हणून ज्येष्ठांनी नियमित डोळे तपासले पाहिजेत. ही योजना ज्येष्ठ नागरिक, अत्यंत गरजू आणि आर्थिदृष्ट्या असमर्थ रुग्णांसाठी आहे. त्यासाठी स्माईल फाउंडेशनकडे पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव 7038204209 यांच्याशी वॉटर सप्लाय कार्यालयात संपर्क साधावा. सोबतच आदर्श दाढे, कुणाल आत्राम यांच्याशी देखील संपर्क साधू शकता. या योजनेचा लाभ घेण्याची विनंती संस्थेने केली आहे.

केवळ हाच नव्हे तर कपडे वाटप, सायकल वाटप, वृक्षारोपण, जनजागृती, पर्यावरण, बूक बँक, विविध शिबिर, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत संस्थेची भरीव कामगिरी आहे. सोबतच अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व ही संस्था स्वीकारते. ‘नवी दृष्टी’ या उपक्रमाचा श्रीकृष्ण भुवन जवळील अलोणे नेत्ररुग्णालयात छोटेखानी कार्यक्रमात आरंभ झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव, उपाध्यक्ष पीयुष आत्राम सचिव आदर्श दाढे, विश्‍वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, कुणाल आत्राम, सचिन जाधव, तन्मय कापसे, अनिकेत वासरीकर, घनश्याम हेपट, मयूर भरटकर,राज भरटकर, कार्तिक पिदुरकर, विष्णु घोगरे इत्यादि सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here