वणी तालुक्यात भीषण पाणीटंचाई – आमदार संजय देरकर यांचे प्रशासनाला कठोर निर्देश.

0
319

वणी तालुक्यातील 25 गावांना भीषण पाणीटंचाई – आमदार संजय देरकर यांचे प्रशासनाला कठोर निर्देश.

राजु तुरणकर – संपादक 

वणी (ता. वणी) – वणी तालुक्यात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पाणीटंचाईवर आमदार संजय देरकर यांनी प्रशासनाची झोप उडवणारे स्पष्ट आणि कडक निर्देश दिले आहेत. तालुक्यातील २५ पेक्षा अधिक गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे, याची गंभीर दखल घेत त्यांनी तहसील कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठक घेतली. बैठकीस उपविभागीय अधिकारी हिंगोले, गटविकास अधिकारी गज्जलवार, पंचायत समितीचे सर्व ग्रामसेवक, तसेच वणी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार संजय देरकर म्हणाले, “ज्या गावांमध्ये टाकी उपलब्ध आहे, तिथे १००% बोरविहीर पुनर्भरण कार्यक्रम राबवला गेला पाहिजे. ही भविष्यासाठी अत्यावश्यक बाब आहे व त्याची सक्तीने अंमलबजावणी झाली पाहिजे.”

पोहना, पेटूर, रासा, साखरा को, विकोली परिसर अशा अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन व एमएसईबीच्या अर्धवट व हलगर्जी कामांमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

“जलजीवन मिशनच्या अर्धवट व निकृष्ट कामामुळे सरपंचांना जनतेचा रोष सहन करावा लागतो, हा अन्याय आहे. प्रशासनाने या कामांची जबाबदारी स्वीकारून ती तात्काळ पूर्ण करावी,” अशी ठणकावून सूचना आमदारांनी केली.

विकोली परिसरातील खान बाधित गावांना तातडीने नियमित पाणीपुरवठा करावा, तर टँकरद्वारे पुरवठा सुरू ठेवण्यात यावा, असे आदेशही देण्यात आले.

ही बैठक केवळ आढावा न राहता थेट कृतीचा आराखडा बनवणारी ठरली. पाणी हा मूलभूत हक्क असून, त्यासाठी कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही आमदार संजय देरकर यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here