धडाकेबाज बातमी- वणी नगरपरिषदेच्या कंत्राटदाराचा ‘धक्कादायक’ कारनामा; प्रगती नगरमध्ये खुलेआम वीज चोरी!
मुख्याधिकारी नगरपरिषद यांचे उत्तर येण्याची प्रतीक्षा, वीजवितरण करणार गुन्हा दाखल- मुख्य अभियंता
राजु तुरणकर – वणी शहरातील प्रभाग क्र. २, प्रगती नगर परिसरात सुरू असलेल्या पाईपलाईन कामांदरम्यान मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून, नगरपरिषदेच्या कंत्राटदारानेच दिवसाढवळ्या वीज चोरी केल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शहरात संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, प्रगती नगरमध्ये पाईपलाईन टाकण्यासाठी जड यंत्रसामग्रीचा वापर सुरू आहे. मात्र, या कामासाठी अधिकृत वीज जोडणी न घेता थेट मुख्य विद्युत वाहिनीवरून आकडे टाकून वीज चोरी केल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
व्हिडिओ व्हायरल – प्रशासनावर सवाल स्थानिक नागरिकांनी हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला असून, व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. सरकारी काम करणाऱ्या कंत्राटदारानेच कायद्याला हरताळ फासल्याने नगरपरिषदेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“अधिकाऱ्यांची डोळेझाक का?” हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असताना संबंधित अधिकारी आणि महावितरण यंत्रणा नेमकी कुठे होती? कारवाई का झाली नाही? असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.
जनतेचा संताप शिगेला “सामान्य माणसाने वीज चोरी केली तर तात्काळ दंड आणि गुन्हा दाखल होतो. मग कंत्राटदारासाठी वेगळा कायदा आहे का?” असा रोष व्यक्त होत आहे. “चोर सोडून संन्यासाला फाशी” अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीकाही होत आहे.
संबंधित कंत्राटदारावर त्वरित गुन्हा दाखल करावा, वीज चोरी प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अशी विचारणा अभियंता एकरे यांना केली असता मुख्याधिकारी नगरपरिषद वणी यांच्या खुलासा आल्या नंतर कुणावर गून्हा दाखल करणार हे ठरवू असे स्पष्ट केले.
या प्रकरणामुळे वणी शहरात प्रशासनाच्या भूमिकेबाबत अविश्वास वाढत असून, तात्काळ कारवाई करावी अशी चर्चा सुरू आहे.













