गौराळा येथील नागरिकांचा विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार……
स्मशान भूमी वाद, ग्रामवासी आक्रमक…सोमेश्वर गेडेकर यांच्या नेतृत्वात नागरिक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर….
आनंद नक्षणे-मारेगाव तालुक्यातील गौराळा येथील स्मशान भूमिकडे जाणारा रस्ता खडीकरण व काँक्रीटीकरण निवडणुकीपूर्वी करुन न दिल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे गावकऱ्यांच्या वतीने थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
शासनाच्या निर्णयानुसार गाव तिथे स्मशानभुमि व स्मशान भुमि तिथे रस्ता असा निर्णय असुन सुध्दा गौराळा गावात आजही स्वातंत्र्य काळापासुन स्मशान भुमिकडे जाण्यासाठी रस्ताच नव्हता. तरी पण त्या स्मशानभुमी जागेवर २०१३ मध्ये शेडचे बांधकाम करण्यात आले. परंतु आज तागायात रस्त्याचे काम झाले नाही, याची खंत बाळगुन गावकरी सातत्याने रस्त्याची मागणी करीत आहे. २०१५ ला तहसिल कार्यालयासमोर गावकरी उपोषणाला बसुन १० फुट पांदण रस्ता अधिकृत करुन घेतला तेव्हा पासुन ते २०२३ पर्यंत तो रस्ता काँक्रीटीकरण तर सोडा साधं खडीकरण सुध्दा करण्यात आले नाही.
यासंदर्भात वारंवार पं.स.मारेगांव दि. २३/०३/२०२३ ला पण निवेदन दिले. विद्यमान आमदार यांना सुध्दा दि.०१/०२/२०२३ ला निवेदन देवून अवगत करण्यात आले, जिल्हाधिकारी यवतमाळ येथे सुध्दा पत्रव्यवहार करण्यात आले. परंतु प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिले नसल्याच्या आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
दि.२४/०४/२०२३ ला पंचायत समिती समोर उपोषणाला बसुन सुध्दा अजुन पर्यंत काही निर्णय दिला नाही किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधीने किंवा प्रशासनाला अजुन पर्यंत निधी मंजुर करून दिला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात. आले आहे.
उन्हाळ्यामध्ये सुध्दा त्या रस्त्याने ये जा करणे कठीण आहे. तर पावसाळ्यामध्ये गावात जर कोणाची मयत झाली तर आम्हा ग्रामवासीयांना प्रश्न पडतो कि, प्रेत न्यायचे कोठुन प्रेताची अवहेलना करित कसे बसे प्रेत स्मशानभुमीकडे नेण्यात येते व अंत्यविधी करण्यात येत असल्याने गावकरी आक्रमक झाले आहे.
करिता मौजा गौराळा स्मशान भुमिकडे जाणारा रस्ता खडीकरण व काँक्रीटीकरण एक महिन्याचे आत निधी मंजुर करुन न मिळाल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीस संपूर्ण गौराळा येथील समस्त गावकरी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले यावेळी सोमेश्वर बंडु गेडेकर, ग्रा.प.सदस्य, सुरेश नानाजी काळे, अरविंद कवडु तुराणकर, गणेश नामदेव येरगुडे, योगेश सुनिल भोयर, अंकुश मारोती मडावी, प्रफुल पुंजाराम काकडे व असंख्य गावकरी व महिला उपस्थित होत्या.