चपराशी परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याचा परीक्षार्थींचा आरोप. पंचायत समितीचे अधिकारि वादाच्या भोवऱ्यात.
पूर्वनियोजित कट कारस्थान करून परीक्षा घेतल्याचा गंभिर आरोप. पंचायत समितीतून दिलेला लिफाफा सभागृहात पोहचायला लागला अर्धा तास.
राजु तुरणकर – संपादक.
वणी तालुक्यातील नांदेपरा ग्राम पंचायत मध्ये रिक्त झालेल्या शिपाई पदाच्या भरती करिता झालेल्या लेखी परीक्षेत घोळ करीत असक्षम उमेदवाराला षडयंत्र रचून पास करून नियुक्ती दिल्याबद्दल परिक्षार्थ्यांकडून ह्याचा विरोध करीत जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करीत योग्य चौकशी करून परीक्षेचा निकाल मेरिट लिस्ट नुसार देण्यात येऊन सक्षम उमेदवाराला न्याय द्यावा, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नांदेपेरा ग्रामपंचायत मध्ये शिपाई पद रिक्त असल्याने दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी वणी पंचायत समिती कडून लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत १० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. ह्या लेखी परीक्षेचा निकाल परीक्षा संपल्यानंतर अर्ध्या तासात तोंडी सूचनेने जाहीर करण्यात आला. ह्या निकालाने परिक्षार्थ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊन रोष निर्माण झाला. त्यांनी ह्या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२४ ला तक्रार केली. परंतु त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने शेवटी दिनांक २ जानेवारी २०२५ ला उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना युवा सेनेचे (उबाठा) उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, नांदेपेरा शाखा प्रमुख सुरेश शेंडे, राजु तुरणकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
ह्या निवेदनात ह्या परिक्षार्थ्यांनी तक्रार केली की, परीक्षा सुरू असताना सभागृहातील परीक्षकांनी ज्याचा अनेक वर्षापासून शिक्षणाशी संबंध नाही अश्या संबंधित उमेदवाराला सहकार्य करण्यासाठी मागील बाकावर बसविण्यात आले व त्यांना ह्या परीक्षेत उत्तीर्ण करून अन्य उमेदवारांशी अन्याय करण्यात आला. ही परीक्षा वणी पं.स. चे गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शनात घेण्यात आली. या परीक्षेत परीक्षकांनी बैठक व्यवस्था बदलविली ज्यामुळे संबंधित उमेदवाराला सहकार्य मिळाले. त्यामुळे ह्या परीक्षेची चौकशी समिती नेमून निष्पक्ष चौकशी करून येत्या चार दिवसात परीक्षेतील परिक्षार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा परीक्षार्थी वणी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा परीक्षार्थी सचिन चिकटे, तुषार खामनकर, पवन कोडापे, अजय कीन्हेकर, राहुल वांढरे, धीरज खामनकर, प्रवीण खैरे, साहिल ठमके, प्रफुल पावले आदींनी दिला आहे.